मुंबई : देशभरात महागाईचा भडका उडाल्याने सामान्य नागरीक त्रस्त झाला आहे.पेट्रोल-डिझेल,भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्याबाहेर गेल्यामुळे सामान्यांना जगणे कठीण झाले आहे. महागाई कमी करु, रोजगार देऊ असे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारलाही जनता 'अच्छे दिन' ची विचारणा करत आहे. याला विरोध करत एनडीएत सहभागी असणारी शिवसेनाही या मुद्द्याला घेऊन आक्रमक झाली आहे. महागाईला विरोध करण्यासाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरुन सरकारचा निषेध करणार आहे.
सकाळी १० वाजल्यापासून हे मोर्चे, आंदोलने सुरू होणार आहेत. मुंबईतील वांद्रे, बोरीवली, घाटकोपर, कांदिवली, कुर्ला, दादर, करीरोड, लोअर परेल अशा ठिकाणाहून आंदोलन तसेच मोर्चे निघणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मुलुंडपर्यंत, चर्चगेटपासून दहिसरपर्यंत मुंबईच्या प्रत्येक विभागामधील आबालवृद्धांसह हजारो नागरिक त्यात सहभागी होणार असल्याचे सेनेतर्फे सांगण्यात येत आहे. वाहतूककोंडी होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. तसेच अतिरिक्त सुरक्षा बलही तैनात करण्यात आले आहे.