मुंबई: सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय घ्यावा. मराठा समाजाचा अंत पाहू नका. अन्यथा हे आंदोलन आणखी चिघळेल, असा इशारा शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी दिला.
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर रामदास कदम प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सरकारने तातडीने अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाला तात्काळ मंजूरी द्यावी. त्यानंतर संसदेतही हा प्रस्ताव मंजूर करुन घ्यावा, असे कदम यांनी म्हटले. मराठा समाजाचा अंत पाहिल्यास हे आंदोलन आणखी चिघळेल, असा इशाराही यावेळी कदम यांनी दिला.
याशिवाय, मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या नेत्यांशी चर्चा करावी. जेणेकरुन इतर समाजाचे नेते त्याला विरोध करणार नाहीत, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे कदम यांनी सांगितले.