मोठी बातमी: मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामा देतील.

Updated: Jul 30, 2018, 04:47 PM IST
मोठी बातमी: मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत title=

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. या मुद्द्यावरुन सरकारची चहुबाजूंनी कोंडी झाली असताना काँग्रेस पक्षाने सरकारला पुरते अडचणीत आणण्याचा चंग बांधला आहे. यासाठी आता काँग्रेसच्या सर्व आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिल्यास काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामा देतील, अशी अटकळ बांधली जात आहे. असे झाल्यास फडणवीस सरकारची मोठी कोंडी होऊ शकते.

यापूर्वी सात मराठा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपले राजीनामे पाठवून दिले होते. त्यामुळे सरकार काय भूमिका घेणार याकडे, सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
 तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याची मागणी केली.

मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे, असे उद्धव यांनी सांगितले. या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले आहेत.