मुंबई: शिवसेना हा मुख्यत: मुंबई आणि कोकण या भागांपुरता मर्यादित असलेला पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेला संपूर्ण राज्याचा कारभार एकट्याने चालवणे यापूर्वी कधीच जमले नव्हते, असे वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 'टाईम्स ऑफ इंडिया' या दैनिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु असलेल्या सत्तावाटपाच्या संघर्षावर भाष्य केले.
शिवसेना आणि भाजप यांच्यात निवडणुकीपूर्वी सत्तावाटपाचे सूत्र ठरले होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यामध्ये परस्पर बदल केल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा तिढा उद्भवला असावा, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
आजचा दिवस बैठकांचा, पाहा कोणते नेते कोणाला भेटणार ?
मात्र, शिवसेनेने यापूर्वी संपूर्ण राज्याचा कारभार कधीच एकट्याने हाताळलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शिवसेना हा मुख्यत: मुंबई आणि कोकणापुरता मर्यादित असलेला पक्ष आहे. काहीप्रमाणात मराठवाड्यातही त्यांनी हातपाय पसरले आहेत. परंतु, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र याठिकाणी शिवसेनेला कधीच फारसे यश मिळालेले नाही. परिणामी २००० सालानंतर शिवसेनेने कधीही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरल्याचे ऐकिवात नाही, असे चव्हाण यांनी म्हटले.
सरकार बनवण्याच्या नादात शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल करू नका- शिवसेना
तसेच देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची सत्ता हाताळणे हे नेहमीच अवघड असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील इतर राज्यांमध्ये दोनच प्रमुख पक्ष असतात. त्यामुळे मुख्यमंत्री निवडणे, तुलनेत सोपे जाते. परंतु, महाराष्ट्रासारख्या चार तुल्यबळ राजकीय पक्ष असणाऱ्या राज्यात हे काम अवघड होऊन बसते, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.