महाराष्ट्रात १९९५ ची पुनरावृत्ती होणार ?

...तर भाजपला बसणार मोठा धक्का

Updated: Nov 4, 2019, 08:27 AM IST
महाराष्ट्रात १९९५ ची पुनरावृत्ती होणार ? title=

संजय पाटील, मुंबई : राज्यातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. पण सेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदामुळे सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत  भाजप आणि शिवसेना हे पक्ष अनुक्रमे सर्वात मोठे पक्ष ठरले. पण अजुनही या दोन्ही पक्षांमध्ये सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे.

राज्यात १९९५ सालची पुनरावृत्ती ?

महाराष्ट्रात १९९५ साली विधानसभेवर भगवा फडकला होता. पहिल्यांदा युतीचं सरकार आलं होतं. परंतु ९५ च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेसच्या तेव्हा एकूण ८० जागा निवडून आल्या होत्या. काँग्रेसने तेव्हा एकूण २८६ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. शिवसेनेचे एकूण १६९ जागांवर उमेदवार उभे होते. त्यापैकी ७३ उमेदवारांचा विजय झाला होता. तर भाजपचे ६५ उमेदवार निवडून आले होते.

राज्यात ९५ साली काँग्रेसच्या सर्वाधिक ८० जागा आल्या असल्या तरी शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांनी एकत्र येत सत्तास्थापन केली होती. शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांचे मिळून एकूण १३८ उमेदवार आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेना-भाजपला मॅजिक फिगर गाठण्यासाठी अवघ्या काही आमदारांची गरज होती. काही अपक्षांनी मदत घेत त्यांनी सत्ता स्थापन केली होती. अपक्ष आमदारांचं सेना-भाजपला समर्थन मिळाल्याने राज्यात १९९५ साली युतीचं सरकार आलं होतं.

राज्यात कोणाचं सरकार ?

१९९५ साली राज्यात काँग्रेस मोठा पक्ष ठरला होता. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. पण सत्तास्थापना आणि मु्ख्यमंत्री पदावरुन युतीमध्ये हमरीतुमरी पाहायला मिळतेय. तर दुसऱ्या ठिकाणी मात्र सेनेने भाजपला वगळून काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत येऊन सत्तास्थापन करावी अशी मागणी सोशल मीडियातून होतांना दिसते आहे. त्यामुळे आता कोण सत्तास्थापन करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.