लोकसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेकडून भावना गवळींचे नाव

 लोकसभा उपाध्यक्षपदी खासदार भावना गवळी यांचे नाव शिवसेनेकडून सूचवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Updated: Jun 6, 2019, 09:08 PM IST
लोकसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेकडून भावना गवळींचे नाव  title=

मुंबई : लोकसभा उपाध्यक्षपदी खासदार भावना गवळी यांचे नाव शिवसेनेकडून सूचवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. सलग पाचव्यांदा लोकसभेत निवडून जाऊनही संधी न मिळाल्याने भावना गवळी नाराज होत्या. मात्र आता उपाध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. भावना गवळी यांच्याकडे गटनेतेपद सोपवले जाण्याचा विचार होता. मात्र हे पद गवळी यांनी नाकारले होते. त्यामुळे त्यांची नाराजी कशी दूर करायची, असा शिवसेनेपुढे प्रश्न निर्माण झाला होता.

दरम्यान, भाजपकडून शिवसेनेला एकच केंद्रात मंत्रीपद देण्यात आले आहे. 'अवजड उद्योग' खात्याचे दुय्यम मंत्रीपद देऊन शिवसेनेची बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेत अंतर्गत नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेने लोकसभा उपाध्यक्षपीत दावा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेनेने उपसभापती पदाची मागणीबाबत म्हटले आहे, हा आमचा नैसर्गिक हक्क आहे. त्यामुळे मागणी केलेली नाही. तर तो आमचा हक्क आहे, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे भाजपकडून ही मागणी होणार की नाही, याची उत्सुकता लागली आहे.

युतीच्या जागावाटपाबाबत गेल्या काही दिवसांपासून असलेल्या तणाव दूर करण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर येथे केला आहे. जागावाटपाचं ठरलेय, युतीबाबत काळजी करू नका, असे त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटल यांच्यासोबत कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तर दुसरीकडे लोकसभा उपाध्यक्षपदाबाबतही त्यांनी युती दोन-चार पदांसाठी नव्हे तर हिंदुत्वासाठी असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच युती तुटू देणार नसल्याची ग्वाहीदेखील उद्धव ठाकरे यांनी दिली.