पावसाळ्यात मुंबई मेरी 'जाम' होण्याच्या मार्गावर

पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होणार

Updated: Jun 6, 2019, 07:41 PM IST
पावसाळ्यात मुंबई मेरी 'जाम' होण्याच्या मार्गावर title=

दीपाली जगताप पाटील, झी २४ तास, मुंबई : आधीच वाहतूक कोंडीनं हैराण असलेल्या मुंबईकरांना येत्या काळात मध्य आणि दक्षिण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. दुष्काळात तेरावा महिना असं म्हटलं जातं. पण पावसाळ्यात तेरावा महिना, अशी स्थिती होणार आहे. मुंबई मेरी जाम होण्याच्या मार्गावर आहे. येत्या पावसाळ्यात तर मुंबईतली वाहतूक कोंडी प्रचंड वाढणार आहे. 20 धेकादायक पूलांच्या डागडुजीचं काम लवकरच सुरु होणार आहे. जवळपास वर्षभरापासून बंद असलेल्या लोअर परळ पूलाचं कामही रखडलं आहे.

परळ, दादर, वरळी, लालबाग, भायखळा, शिवडी, वडाळा परिसरात सध्या प्रचंड वाहतूक कोंडी होते. लोअर परळ पूलाचं काम रखडल्यानं येत्या काळात करी रोड, चिंचपोकळी, भायखळा पूलावरची अवजड वाहतूक बंद होणार आहे. दादर पूर्व-पश्चिमेला जोडणारा अत्यंत महत्वाचा असलेला टिळक पूलाची डागडुजी करावी लागणार आहे. 

सध्या टिळक पूल आणि प्रभादेवी पूलावर संपूर्ण वाहतूकीचा बोजा आहे. महत्वाचं म्हणजे केईएम, टाटा, वाडिया रुग्णालयाकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही फटका बसणार आहे. सँडहर्स्ट रोड पूल, शिवडी पूल, लोअर परळ पूलाचं काम रखडलं आहे.

आधीच मुंबई दरवर्षी तुंबते आणि वाहतूक कोंडी होते. आता जवळपास दोन डझन पूलांचं काम सुरू आहे. मुंबईकरांनो, पावसाळ्यात प्रवासाची काळजी घ्या.