शिवसेना-भाजपचे मनोमीलन; लोकसभेला २३-२५, विधानसभेला ५०-५० चा फॉर्म्युला

शिवसेना-भाजप सैद्धांतिकतेचा दाखला देत एकत्र

Updated: Feb 18, 2019, 08:49 PM IST
शिवसेना-भाजपचे मनोमीलन; लोकसभेला २३-२५, विधानसभेला ५०-५० चा फॉर्म्युला title=

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आणि भाजपच्या युतीवर अखेर सोमवारी संध्याकाळी शिक्कामोर्तब झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. त्यानुसार शिवसेना-भाजप लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुका एकत्रितरित्या लढतील. लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३ आणि भाजप २५ जागांवर लढेल. तर विधानसभा निवडणुकीत घटकपक्षांना जागा दिल्यानंतर शिवसेना-भाजप समसमान जागांवर लढतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी युतीमागची भूमिकाही स्पष्ट केली.  आमच्यात मतभेद असतील, पण सैद्धांतिकदृष्ट्या आमचा विचार एकच आहे. तब्बल २५ वर्षे शिवसेना-भाजपची युती होती. मात्र, गेल्या निवडणुकीत आम्हाला काही कारणांमुळे एकत्र येता आले नाही. मात्र, त्यानंतर गेली साडेचार वर्षे केंद्र व राज्यात आम्ही एकत्रितरित्या सरकार चालवत आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले. गेल्या काही काळापासून काही लोक एकत्र येऊन देशात संक्रमणाची अवस्था निर्माण करत आहेत. त्यांनी राष्ट्रीय विचारांना आव्हान दिले आहे. अशावेळी शिवसेना व भाजपसारख्या राष्ट्रीय विचार असलेल्या पक्षांनी एकत्रितरित्या निवडणूक लढवावी, अशी जनभावना होती. याच जनभावनेचा आदर करून शिवसेना-भाजप लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रितरित्या लढवतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेपूर्वी अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याठिकाणी दोघांमध्ये तब्बल पाऊणतास चर्चा सुरू होती. या बैठकीला भाजपकडून अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर , प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई हे नेते उपस्थित होते.