पुणे: सक्तवसुली संचलनालयाच्या ( ईडी) चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला, असा खळबळजनक दावा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ते सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना शिवसेना-भाजपच्या होऊ घातलेल्या युतीबद्दल प्रश्न विचारला. यावर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले की, आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी शिवसेनेवर दबाव टाकण्यात आला. मात्र, शिवसेना या दबावाला जुमानत नसल्यामुळे भाजपकडून उद्धव ठाकरे यांना ईडीच्या चौकशीची भीती घालण्यात आली, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपकडून शिवसेनेसोबत युती करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते. सुरुवातीला शिवसेना या प्रयत्नांना बिलकूल दाद देत नव्हती. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पडद्यामागे गुप्तपणे चर्चा सुरु होती. मात्र, शिवसेना अशी कोणतीही चर्चा सुरु असल्याच्या बातम्या फेटाळत होती. अखेर १४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री वारीनंतर सर्व चक्रे फिरली. यानंतर अमित शहा आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर दोन्ही नेते पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करतील, अशी शक्यता आहे.