अयोध्या, राम मंदिर आणि बाबरी मशीद... काय होती बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका?

Balasaheb Thackeray Birth Anniversary : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 98 वी जयंती आहे. कालच अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण झालं. यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांची अयोध्येतील राममंदिराबाबत काय भूमिका होती हे जाणून घेऊया

राजीव कासले | Updated: Jan 23, 2024, 12:08 PM IST
अयोध्या, राम मंदिर आणि बाबरी मशीद... काय होती बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका? title=

Balasaheb Thackeray 98th Birth Anniversary : ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण अख्ख्या जगानं अनुभवला. अयोध्येतल्या राममंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा (Ram Lalla Pran Pratishtha) झाली. 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रामलल्ला आज मंदिरात विराजमान झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ह्यांनी पाहिलेलं स्वप्नं आज पूर्ण झालं, सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचं आणि बलिदानाचं सोनं झालं, असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. 

6 डिसेंबर 1992
6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी अयोध्येतील बाबरी मशीदीचा (Babri Masjid) ढाचा पाडला. सकाळी दहाच्या सुमारास लाखांच्या संख्येत अयोध्येत कारसेवक जमले. हिंदुत्ववादी संघटनांनी बाबरी मशिदीभोवती 'कारसेवा' करण्याचं आवाहन केलं होतं.  6 डिसेंबरच्या दुपारपर्यंत जमावाने वेगळं रूप घेतलं. काही तरुण मशिदीच्या घुमटावर चढले. तिथं त्यांनी भगवा झेंडा फडकवला. जमलेल्या गर्दीनं बाबरी मशीद तोडायला सुरुवात केली. त्यानंतर देशात प्रचंड सांप्रदायिक दंगेही उसळलेले बघायला मिळाले होते. अयोध्येत झालेल्या या घटनेनंतर बाळासाहेबांनी ठाकरी शैलीत आपली भूमिका मांडली.

काय होती बाळासाहेबांची भूमिका
एका मुलाखतीतही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका मांडली होती. 'बाबरी पाडली ही गौरवाचीच गोष्ट आहे. त्यात लाजण्यासारखं काही नाही. बाबरी मशीद पाडली गेली, कारण त्या खाली राम मंदिर होतं. इतिहास असं म्हणतो की, बाबरानं हिंदू देवळं पाडली. आता आम्ही स्वतंत्र झालो आहोत, मशिदीच्या जागी देवळं उभी करू, यात मुस्लिमांनी सहभागी व्हावं' 

या मुलाखतीत बाळासाहेबांना तुम्ही मुस्लीमविरोधी आहात का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बाळासाहेबांनी अत्यंत चोख उत्तर दिलं होतं. बाळासाहेब म्हणाले होते 'हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मी मुस्लिमांच्या विरोधात नाही. फाळणीच्या वेळी जे पाकिस्तानात गेले आणि जे इथे राहिले ते आपलेच आहेत. प्रशन भारतीय मुस्लिमांची नसून बांगलादेशी घुसखोरांचा आहे.  हिंदुस्तानातील मुस्लीम समाजाने बाबरी इथल्या हिंदू मंदिराचं संवर्धन करण्याच्या कामात मदत करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. शिवसैनिक हे बाबरी मंदिराचा ढाचा पाडण्यासाठी गेले नव्हते? असा प्रश्न विचारल्यावर, ही तर मग खुप लाजिरवाणी गोष्ट आहे, असं विधान बाळासाहेबांनी केलं होतं.

राज ठाकरे यांनी सांगितला किस्सा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बाबरी मशीदीसंदर्भातील एक किस्सा सांगितला. बाबरी मशीद पडली त्यावेळी टेलिव्हिजनवर सतत बातम्या दाखवल्या जात नव्हत्या. बाबरी मशीद पडल्यानंतर दीड ते दोन तासांनी बाळासाहेबांना एक फोन आला. समोरच्या व्यक्तीने सांगितलं, भाजपचे नेते म्हणतात की, हे काही आम्ही केलेलं नाही. ते कदाचित शिवसैनिकांनी केली असेल. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, ते शिवसैनिक असतील, तर मला त्यांचा अभिमान वाटतो. त्यावेळी बाबरी मशीद पडली. याची जबाबदारी घेणे किती मोठी गोष्ट होती असं राज ठाकरे यांनी सांगितलं.