मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युतीला चांगले यश मिळाले. शिवसेनेने आधी जे ठरले आहे, ते द्यावे अशी मागणी केली. युतीकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत असताना ५०-५० टक्के सत्तेत वाटा हवा, या मागणीवरुन युतीत वाद विकोपाला गेला आहे. शिवसेना आणि भाजपकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. भाजपकडून आम्ही कसलेही आश्वासन दिलेले नव्हते असे सांगण्यात आले. तर शिवसेनेने जे ठरले आहे, ते द्या अशी मागणी केली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनौपचारिक गप्पानंतर युतीत ठिणगी पडली आणि शिवसेनेने चर्चेचे दार बंद केले. यानंतर राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे महत्व वाढले. आता त्यांनीच युतीच्या नेत्यांना सल्ला दिला आहे. शरद पवारांनी वडिलकीचा सल्ला देताना सांगितले, भांडत बसू नका. कोणी कोणाला खोटे ठरविण्याचा प्रयत्न करु नये.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर दिले. त्यावेळी फडणवीस यांनी असे काहीही ठरलेले नाही असे सांगितले. मात्र, फडणवीस खोटे बोलत आहेत, मी खोटं बोलणाऱ्यांशी चर्चा करणार नाही, असे उद्धव यांनी पत्रकार परिषद घेवून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद सत्ता स्थापन होण्याआधीच विकोपाला गेला. यावर शरद पवार यांनी उद्धव आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना सल्ला दिला आहे. कोणी कोणाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नये, वडिलधारी म्हणून मी हा सल्ला देईन.
दरम्यान, राष्ट्रवादीबरोबर शिवसेना चर्चा करत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर पवार म्हणालेत, ते इतक्या वर्षाचे मित्र आहेत. त्यांना वाटले इतर कुणाबरोबर तरी बोलावे म्हणून ते बोलले. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी कोपरखळी मारली. अजून भाजप आणि सेनेची युती तुटल्याचे कळलेले नाही. पण काल त्यांची निवेदन ऐकल्यावर वाटत ते एकमेकांपासून दूर गेले आहेत, त्यातही एकत्र आले तरी सरकार टिकणार नाही. आम्ही आज राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे, असे ते म्हणालेत.