मुंबई : राज्यातला सत्ता स्थापनेचा पेच काही सुटताना दिसत नाहीये. त्यातच आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार घडामोडी होत आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. राज्यातल्या राजकीय घडामोडींबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर शरद पवार उद्या संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीला ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची पुढची भूमिका स्पष्ट व्हायची शक्यता आहे.
युतीच्या सत्तास्थापनेत तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. आजच्या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, तटकरे आणि धनंजय मुंडे उपस्थित आहेत. शिवसेनेला अडीच वर्ष नव्हे तर पाच वर्ष मुख्यमंञी पदाची संधी आहे, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे.
काँग्रेसमध्ये मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून दोन गट असल्याचं चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधीच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी निर्णय घेतील, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीत दोन्ही पक्षांची भूमिका स्पष्ट होईल.
काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं आहे. शिवसेनेकडून सरकार स्थापनेचा प्रस्ताव आल्यास काँग्रेसनं पाठिंबा द्यावा असं पत्र दलवाईंनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहलंय. भाजप आणि शिवसेनेत फरक असल्याचं दलवाईंनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. सुशीलकुमार शिंदे आणि संजय निरुपम यांनी मात्र शिवसेनेसोबत जायला विरोध केला आहे.
हुसेन दलवाईंसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.