मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारचं 'रिमोट कंट्रोल' राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हातात राहण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विकास आघाडीचा कारभार सुरळीत चालण्यासाठी यूपीएच्या धर्तीवर एक समन्वय समितीही स्थापन करण्यात येणार आहे. लवकरच या समितीची स्थापनाही होण्याची शक्यता आहे. या समितीचे प्रमुख म्हणून शरद पवार यांच्या नावाचा विचार सुरू आहे. सरकारला सल्ला देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र येऊन या समितीची स्थापना करतील. ही समिती मुख्यमंत्र्यांनाही दिशा देईल. शरद पवार या समितीचे प्रमुख राहिले तर तेच ठाकरे सरकारचे 'सुपर बॉस' ठरतील यात शंका नाही.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथग्रहण सोहळा गुरुवारी पार पडतोय. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या शपथग्रहण सोहळ्यासाठी ममता बॅनर्जी, नीतीश कुमार, जगनमोहन रेड्डी हेदेखील सहभागी होतील. ठाकरे ३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करू शकतील.
दरम्यान, अजित पवार यांनाच मुख्यमंत्री म्हणणारे अनेक पोस्टर बारामतीत दिसू लागले आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडीत सत्तावर्चस्वासाठी वेगळं राजकारण सुरू होतंय का? असाही प्रश्न अनेकांना पडलाय.
गुरुवारी होणाऱ्या शपथविधीसाठी शिवाजी पार्कसोबतच शिवसेना भवन सजलंय. परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. या शपथविधीसाठी २००० पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रक पथक, जलद प्रतिसाद पथक, वाहतूक विभाग असे २००० पोलीस परिसरात तैनात असतील. गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.