महाविकास आघाडी सरकार किती वर्ष चालणार? शरद पवार म्हणाले...

महाविकास आघाडी सरकारला ( Maha Vikas Aghadi Government) वर्षपूर्ती झाली.  

Updated: Dec 3, 2020, 07:18 PM IST
महाविकास आघाडी सरकार किती वर्ष चालणार? शरद पवार म्हणाले...   title=

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला ( Maha Vikas Aghadi Government) वर्षपूर्ती झाली. अनेक संकटांमधून मार्ग काढत हा जगन्नाथाचा रथ यशस्वीपणे पुढे घेऊन जाण्याचे काम आपण सर्वांनी केले आहे. शेती आणि शेतकरी संकटात होता, कोरोनाशी लढा सुरू आहे. पण मागील ५० वर्षांमध्ये मी असे कधी पाहिले नाही की, एक वर्ष पूर्ण होताच सरकारच्या कामगिरीची चिकित्सा सुरू झाली आहे.  हे महाविकास आघाडी (( Maha Vikas Aghadi) सरकार पाच वर्षे चालेल एवढा कद्रूपणा का करायचा? पुढची अनेक वर्षे (२५ वर्षे) हे सरकार चालेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar ) यांनी व्यक्त केला. 

'सरकार पाडण्याच्या अफवा उठवल्या गेल्या'

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही.' या  पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडला. या सोहळ्यास उपस्थित राहताना विशेष आनंद होत आहे, असे सांगत सरकार किती वर्ष चालणार यावर भाष्य केले.  या सरकारमध्ये अनेक सहकारी असे आहेत ज्यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रदीर्घ प्रशासनाचा अनुभव असलेले सहकारीही आहेत. एका बाजुने नवी उमेद तर दुसऱ्या बाजूने प्रदीर्घ अनुभव याचा सुरेख संगम असल्यामुळे हे सरकार यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. 

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि सरकार चालवत असताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिले ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. मुख्यमंत्री अबोल असले तरी चतुर आहेत, त्यांनी तीन पक्षांचे सरकार यशस्वीपणे चालवले आहे. हे सरकार पाच वर्ष जनतेसाठी काम करत राहील, हा मला विश्वास आहे. 

कोरोनाच्या या कठीण काळात उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केल्यामुळेच हे शक्य झाले. लोकांनीही संकट  निवारणात सरकारला साथ दिली, त्यामुळेच हा जगन्नाथाचा रथ पुढे गेला. महाराष्ट्र हे उद्योगधंदे असलेले महत्त्वाचे राज्य आहे. राज्याची गती थांबली तर देशाचे अर्थचक्र थांबू शकते. त्यामुळे कारखान्यांचे चक्र कसे सुरू राहील, लोकांच्या हातातले काम जाणार नाही, याकडे राज्य सरकारने विशेष लक्ष दिले. त्यामुळे राज्यातील कारखानदारी आणि उद्योगधंदे बंद पडले नाहीत, असे पवार म्हणाले. 

गेल्या ८-१० दिवसांपासून पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी रस्त्यावर उपोषणासाठी बसला आहे. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून न घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आहे. पण मागील एक वर्षात राज्यातील बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही,  हे या सरकारचे विशेष यश मानावे लागेल, असा टोला केंद्रातील सरकारला लगावता पवार यांनी राज्य सरकारचे कौतुक केले.