मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राम्हण संस्था यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. गेल्या 40 वर्षात पवार यांनी पहिल्यांदाच असं चर्चेला बोलावलं आहे. मात्र, या बैठकीला ब्राह्मण महासंघाचा कोणताही पदाधिकारी जाणार नाही असं सांगत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी हे निमंत्रण नाकारलं आहे.
शरद पवार यांनी चर्चेला बोलावलं आहे पण, सार्वजनिक व्यासपीठावर त्यांना भेटण्याची ही वेळ नाही. त्यातून दुरावा आणखी वाढेल असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
प्रदीप गारटकर यांच्या माध्यमातून ही मीटिंग होत आहे. ते सर्व ब्राह्मण संस्थांसोबत संपर्क ठेवून असतात. त्यांच्या मध्यस्थीने हे निरोप आले आहेत. तुम्ही सर्वांनी येऊन तुमच्या नाराजीच कारण साहेबांना सांगावं असं त्यांचं म्हणणं आहे.
पण, त्यांची भेट न घेण्यामागे पुढील कारणे आहेत. अगदी परवाच्या प्रकरणानंतर त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांना शब्द माघार घ्यायला सांगायचं होतं. पण, उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी शाहू महाराज आणि ज्योतिष यांची गोष्ट सांगितली. त्याच व्यासपीठावर भुजबळ यांनी पुरोहित हे धंदा करतात ( व्यवसाय नाही ) हा शब्द वापरत पुन्हा टिंगल केली. आरक्षणाच चुकीचं उदाहरणं दिले.
देवांचा बाप असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला तो पण अगदीच काल, परवा. केतकी चितळे पूर्णतः चुकल्याच आपण त्यांच्यावर टीका केली. पण, पवार साहेबांनी केतकी यांना माफ करून जर गुन्हे मागे घेण्यास सांगितलं असत तर ते खूप मोठे झाले असते, असे ते म्हणाले.
केतकी यांच्यावर 28 ठिकाणी गुन्हे दाखल झाले. पण, पोलिसांनी मिटकरी यांच्यावर एकही गुन्हा नोंदवला नाही. आपल्या आंदोलन नंतर राज्यभर समाज जागा झाला. दिवंगत माणसावर शक्यतो कोणीच टीका करत नाही. मात्र, बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली.
शरद पवार यांनी आधी मिटकरी, भुजबळ यांच्या वक्तव्याबाबत भूमिका स्पष्ट करावी. आमचा पवार साहेबांना व्यक्तिगत काहीच विरोध नाही. त्यांच्या मतदार संघातील ब्राह्मण समाज त्यांच्यावर नाराज असल्याचे फारसे ऐकिवात नाही. पण राजकीय फायद्यासाठी ते ब्राह्मण समाजाचा वापर करतातं हे निश्चित, असा आरोपही आनंद दवे यांनी केला आहे.