मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : एकेकाळी मोठी उद्योजिका म्हणून ती समाजात वावरत होती. कधी काळी ती कोट्यवधींची मालकीण होती. कोट्यवधींचे व्यवहारदेखील ती करायची. मात्र, आज जामिनासाठी 2 लाख रुपये भरता भरता तिच्या नाकीनऊ आलेत. कारण... एक खुनी म्हणून तिची ओळख झाली आहे. ती आहे इंद्राणी मुखर्जी ( INDRANI MUKHARJI ) ...
आपल्याच शीना बोरा ( SHEENA BORA ) या मुलीचा खून केल्याचा आरोप इंद्राणी मुखर्जी हिच्यावर ठेवण्यात आला होता. 24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी इंद्राणीचा चालक शामवर राय ( SHAMVR RAY ) याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना ( SANJIEEV KHANNA ) आणि चालक शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना हिची हत्या केली. या दोघांनी 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावली अशी माहिती चालक शामवर राय याने दिली.
शामवर राय याने दिलेल्या माहितीच्या आधारे इंद्राणीला 2015 मध्ये अटक केली गेली. त्यानंतर जवळपास साडे सहा वर्षे इंद्राणी भायखळ्यातील महिला जेलमध्ये तुरुंगात होती. सर्वोच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना तिला 2 लाख रुपये रोख बॉण्ड म्हणून भरण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, इंद्राणी हिच्या वकिलांनी 2 दोन लाख भरण्याची ऐपत नाही. यामुळे किमान एक लाख रुपये बाँड कराव अशी विनंती तिच्या वकिलांनी न्यायालयाला केली होती. परंतु, न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली. त्यामुळे न्यायालयात इंद्राणीला 2 लाख रुपये कॅश भरावेच लागले आहेत.
इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर झाल्याने गेले जवळपास साडे सहा वर्ष भायखळ्यातील महिला जेलमधून ती बाहेर पडेल. इंद्राणी मुखर्जी मर्सिडीज कारमधून जेलबाहेर येईल. तिच्या कुटुंबातील कोणीही तिला जेलमधून घरी नेण्यास येणार नसल्यामुळे ती वकिलांच्या गाडीतून बाहेर येईल.
इंद्राणीसोबत यावेळी एकूण दोन गाड्या असतील. एका गाडीमध्ये (मर्सिडीज) इंद्राणी तर दुसऱ्या होंडा कारमध्ये जेलमधील साडेसहा वर्षांच्या काळातील तिचे सामान सोबत असेल.
भायखळा जेलवरून बाहेर पडल्यावर इंद्राणी मुखर्जी थेट आपल्या वरळी येथील मार्लो बंगला येथे जाणार आहे. ती तुरुंगात असतानाच तिने आपला पती पीटर मुखर्जी याच्याशी घटस्फोट घेतला होता. त्यामुळे तिच्या वाट्याला आलेल्या या बंगल्यात ती एकटीच राहणार असण्याची माहिती मिळतेय. तसेच, जमीन मंजूर करताना न्यायालयाने तिला साक्षीदारांबरोबर बातचीत न करण्याची अट घातली आहे. त्यामुळे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती तिच्याशी बोलण्याची शक्यता कमीच आहे.