प्रशांत अंकुशराव, मुंबई : घाटकोपर शहराला गतवैभव प्राप्त करून देण्याचा चंग घाटकोपरमधील काही ज्येष्ठ नागरिकांनी बांधला आहे. त्यासाठी त्यांनी एक कल्पना लढवली आहे. पाण्याच्या एकेका थेंबाचा उपयोग करून घाटकोपरला पूर्वीचीच हिरवाई दाखवण्याचं स्वप्न आता हळूहळू सत्यात उतरू लागलं आहे.
मुंबईतल्या घाटकोपरला घाटकोपर हे नाव पडलं ते इथल्या घाट माथ्यामुळं. इथं पूर्वी औषधी वनस्पती, भाज्या अशी विपुल वनराई होती. मानवानं डोंगरावर अतिक्रमण केल्यामुळं आता हे रानवैभव लुप्त झालं. मात्र इथं उरलेली निसर्गसंपदा जपण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिक पुढं सरसावले आहेत. घाटकोपर डोंगर ग्रुपच्या वतीनं डोंगरावर अनेक झाडं लावण्यात आली आहेत. ती जगवण्यासाठी या ग्रुपमधील प्रत्येकजण किमान एक लीटर ते पाच लीटरच्या कॅनमधून पाणी घेऊन डोंगरावरील झाडांना देतो.
थेंबे थेंबे तळे साचे, या म्हणीप्रमाणं दररोज सरासरी ५०० लिटर पाणी या डोंगरावर येतं. इथली निसर्गसंपदा आता पुन्हा मानवाला प्राणवायू देण्यासाठी सज्ज होताना दिसते आहे. पर्यावरणाचा ऱ्हास आणि दुष्काळ या समस्या सध्या महाराष्ट्राला भेडसावत असताना घाटकोपरकरांचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य म्हणायला हवा.