राज्यातील शाळा या तारखेपासून सुरु होणार, हे नियम पाळावे लागणार

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढली असली तरी त्याचा शाळांवर कोणताही परिणाम होणार नाही.  

Updated: Nov 29, 2021, 10:52 PM IST
राज्यातील शाळा या तारखेपासून सुरु होणार, हे नियम पाळावे लागणार title=

मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढली असली तरी त्याचा शाळांवर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यात पहिलीपासूनच्या शाळा 1 डिसेंबरलाच शाळा सुरू (Maharashtra School Reopening) होणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. शाळा सुरू करण्यासाठी गाईडलाईन्सही जारी करण्यात आल्या आहेत. (Schools will restart in maharashtra from December 1 says Health Minister Rajesh Tope said)

होणार होणार असं म्हणत राज्य सरकारनं अखेर 1 डिसेंबरपासून पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र अचानक ओमायक्रॉन व्हेरियंटनं एन्ट्री घेतल्यानं शाळांबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला. शाळा सुरू होणार की नाही, यावरून तर्क वितर्क लढवले जात असतानाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संभ्रमावरून पडदा हटवलाय. 

ठरल्याप्रमाणं 1 डिसेंबरपासून शाळा नियमित सुरू होतील असं टोपेंनी सांगितलंय. ओमायक्रॉनसंबधी राज्याला सध्यातरी भीती नाही त्यामुळे लगेचच घाबरून जाण्याचं कारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यावर सध्यातरी शिक्षण विभाग ठाम आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्यात.

शाळा सुरू करण्यासाठी नियमावली

शाळेचा सर्व परिसर निर्जंतुक केलेला असावा. सर्व कर्मचा-यांनी दोन्ही डोस तातडीनं पूर्ण करावेत. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क देण्यात यावेत. विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. सामूहिक खेळ खेळण्यास तसच एकत्र डबा खाण्यास मनाई करण्यात आलीय. 

मार्गदर्शक सूचनांबाबत पुन्हा एकदा टास्क फोर्स सोबत चर्चा करण्यात येणार आहे. शाळा सुरू करण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्सही सकारात्मक असल्याचं समजतंय. शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पालकांनी मात्र संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ओमायक्रॉनची भीती असली तरी शाळा सुरू होणार हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे पालकांनो, तयारीला लागा. अभ्यासासोबत मुलांची काळजीही घ्या.