'आमच्याकडे इतर पर्याय', संजय राऊत यांचा भाजपला इशारा

भाजप-शिवसेनेतला सत्ता स्थापनेचा संघर्ष कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचं दिसतं आहे. 

Updated: Oct 29, 2019, 11:56 AM IST
'आमच्याकडे इतर पर्याय', संजय राऊत यांचा भाजपला इशारा title=

मुंबई : भाजप-शिवसेनेतला सत्ता स्थापनेचा संघर्ष कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचं दिसतं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रात कुण्या दुष्यंतांचे वडील जेलमध्ये नाहीत असा टोला राऊतांनी भाजपला लगावला आहे. भाजप कुठपर्यंत ताणणार हेच आता बघायचंय असं थेट आव्हान त्यांनी दिलं आहे. 

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याकडे पर्याय असल्याचा इशारा देखील भाजपला दिला आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 'उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, आमच्याकडे इतर पर्याय पण आहेत. पण आम्हाला ते पर्याय स्विकारण्याचं पाप करायचं नाही. शिवसेनेने नेहमी सत्याचं राजकारण केलं आहे. आम्हाला सत्तेची भूक नाही.'

संजय राऊत यांनी पुढे म्हटलं की, 'येथे आम्ही आहोत जेथे धर्म आणि सत्याचं राजकारण करतो. शरद पवार ज्यांनी भाजप आणि काँग्रेस विरुद्ध वातावरण तयार केलं. जे कधीच भाजपसोबत जाणार नाहीत.'

'लोकशाहीत कोणीही कोणताही पर्याय निवडू शकतो. आम्ही युती धर्माचं पालन करतो. जर यांचं कोणी पालन करत नसेल तर राज्यातील जनता त्यांना उत्तर देईल. जर तुमचा मित्रपक्ष तुम्हाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी षडयंत्र रचत असेल तर हे योग्य नाही. आम्ही हालचालींवर नजर ठेवून आहोत.

राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना-भाजपकडून हालचाली सुरु आहेत. निवडणुकीत एकत्र लढले असले तरी आता मात्र दोन्ही पक्षाचे नेते उघडपणे एकत्र येत नाही आहेत. शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असल्याने शिवसेनेचा भाव नक्कीच वाढला आहे. पण भाजप शिवसेनेच्या मागण्या पूर्ण करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपचे नेते स्वतंत्रपणे राज्यपालांच्या भेटीला गेल होते. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे सत्तास्थापनेच्या हालचाली करत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.