मुंबई : शिवसेना-भाजप वादामुळे मनसेला भाजपचा पाठिंबा आहे का? असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे.
निरुपम यांनी मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेल्या कार्यालयाची पाहणी केली. यानंतर निरुपम यांनी भाजप, मुख्यमंत्री फडणवीस आणि मनसेवर हल्लाबोल केला.
काँग्रेस कार्यालयावर हल्ला होऊन २४ तास उलटले तरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून त्याबाबत साधा निषेध व्यक्त करण्यात आला नसल्याचं निरुपम यांनी म्हटलंय.
शिवाय सिनेमांवरुन मनसे आणि मुख्यमंत्री यांच्यात वर्षावर डील झाल्याचा आरोपही निरुपम यांनी केलाय. मनसेचे राजकीय दुकान बंद झाल्याने ते असे हल्ले करत असून आपल्यावर हल्ला झाल्यास त्याला उत्तर देऊ असंही निरुपम म्हणालेत.
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासह एकूण ८ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील सीएसटी येथील, आझाद मैदान पोलीस स्टेशनसमोरील काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी, मनसेच्या या कार्यकर्त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील किला कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे.