मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मंगळवारी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल उद्धव ठाकरेंचे अभिनंदन करण्यासाठी सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर मातोश्रीवर गेल्याचे समजते. तब्बल तासभर या दोघांनी मातोश्रीवर पाहुणचार घेतला. हे दोन्ही माजी क्रिकेटपटू एकाच वेळी मातोश्रीवर पोहोचल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. ही भेट राजकीय होती का, अशी शंकाही अनेकांच्या मनात उपस्थित झाली आहे. मात्र, त्यांच्यामध्ये नक्की काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आज भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जी आणि महान क्रिकेटपटू, लिटिल मास्टर सुनील गावस्कर जी यांनी मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी युवासेनाप्रमुख, आमदार @AUThackeray , तेजस ठाकरे उपस्थित होते pic.twitter.com/jiOsXcCrPb
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) December 24, 2019
तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे २६ डिसेंबरला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिले. तसेच हे आंदोलन शांततेत पार पडेल, असे आश्वासनही प्रकाश आंबेडकर यांनी दिले.