मुंबई : कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान मांडल आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस कोरोनाने भारतात शिरकाव केला. आता जुलै महिना उजाडला तरी कोरोनाला हरवण्यात आपल्याला यश आलेलं नाही. अशातच आता आपल्याला कोरोनासोबतच युद्ध २०२१ पर्यंत सुरूच ठेवावं लागणार आहे. आपल्याला कोरोनासोबत आणखी लढावच लागणार आहे, असं सामनाच्या अग्रलेखात आज म्हटलं आहे.
महाभारतापेक्षा कोरोनाविरूद्धचे आधुनिक भारताचे युद्ध अवघड आहे. १८ दिवसांत महाभारत युद्ध संपले होते. हिंदुस्थानने कोरोना संख्येत जगात उच्चांक गाठला ही त्याचीच सुरूवात आहे. बाकी उद्योग, अर्थव्यवस्था, जीवनमान, रोजगार सर्वच कोसळले आहे. अशी परिस्थिती असली तरीही आपल्याला कोरोनासोबत लढावेच लागेल.
कोरोनाच्या यादीत हिंदुस्थान तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या चोवीस तासांत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २५ हजारांवर गेली. हे भयंकर तर आहेच पण आर्थिक महासत्ता बनू पाहणाऱ्या देशाचे दुर्दैव देखील आहे. पुन्हा देशात महाराष्ट्र कोरोनाग्रस्तांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
रविवारी देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ८७ हजारांवर पोहोचली आहे. अशीच चढती भाजणी सुरू राहिली तर आपण या दुर्दैवी प्रकारात जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचू. कोरोनाचे संकट संपले नाही. कोरोना राहणारच आहे व कोरोनाबरोबर जगायची तयारी केली पाहिजे. या प्रवासात धोका आहे. पण स्वतःला सुरक्षित ठेवून हा धोक्याचा प्रवास प्रत्येकाला करावा लागेल. १८ दिवसांत महाभारत युद्ध संपले होते. पण कोरोनाचे युद्ध २१ दिवसांत संपलेच नाही. ते २०२१ पर्यंत चालेल.