रोहित पवारांकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण; चंद्रकांत पाटलांना टोला

तुमच्या सत्ताकाळात मंत्रीपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रीपद मिळाले होते.

Updated: Mar 2, 2020, 11:02 AM IST
रोहित पवारांकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण; चंद्रकांत पाटलांना टोला title=

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना अनुभव नसतानाही मंत्रीपद मिळाले, अशी टीका केली होती. चंद्रकांत पाटलांच्या या टीकेला रोहित पवार यांनी पुढे सरसावत प्रत्युत्तर दिले. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचे काम बघावे. तुमच्या सत्ताकाळात मंत्रीपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रीपद मिळाले होते. याच अनुभवातून तुम्ही बोलत आहात का?, असा खोचक सवाल रोहित पवार यांनी पाटील यांना विचारला. 

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवणाऱ्या आशिष शेलार यांनाही रोहित पवार यांनी खडे बोल सुनावले. राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात ६० तर दुसरे म्हणतात ५० जिंकू...आहेत त्या आठ टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर.. विनोदीच आहे सगळं, अशी जळजळीत टीका शेलार यांनी केली होती. 

त्याला प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी म्हटले की, सुरुवातीला भाजपचे दोनच खासदार होते. आज केंद्रात फक्त तुमच्या पक्षासाठी आलेले अच्छे दिन हे तुमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत. राज्यातील तुमच्या पक्षासाठी आलेले बुरे दिन हे अशाच अहंकाराचं फळ आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.