ही काही राजकीय चर्चा नव्हती, राज ठाकरेंची 'झी २४ तास'ला माहिती

शनिवारी सकाळी घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'झी २४ तास'ला स्पष्टीकरण दिलंय. 

Updated: Mar 17, 2018, 02:12 PM IST
ही काही राजकीय चर्चा नव्हती, राज ठाकरेंची 'झी २४ तास'ला माहिती title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : शनिवारी सकाळी घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'झी २४ तास'ला स्पष्टीकरण दिलंय. 

पवारांच्या भेटीनंतर काय म्हणतायत राज ठाकरे... 

आजची झालेली ही भेट 'अचानक' झाली नव्हती तर ती पूर्वनियोजित होती, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. 

'शोध मराठी मनाचा' या कार्यक्रमात पुण्यात झालेल्या पवारांच्या जाहीर मुलाखतीनंतर शरद पवार यांच्याशी नीट बोलणं झालं नव्हतं... त्यामुळे ते मुंबईत आले की भेटण्याचं आधीच ठरलं होतं... त्यानुसार ही भेट झाल्याचं राज ठाकरे म्हणतायत. ही सर्वसामान्य भेटीप्रमाणेच भेट होती... यामध्ये कुठली राजकीय चर्चा झाली नाही... अशी पुश्तीही त्यांनी यावेळी जोडली.

ठाकरे-पवारांची हातमिळवणी?

राज ठाकरे आणि शरद पवार या दोघांचाही एकच उद्देश आहे... आणि तो म्हणजे भाजपची घोडदौड रोखणं... यासाठीच हे दोन दिग्गज राजकीयदृष्ट्या एकमेकांशी हातमिळवणी करणार का? असा प्रश्न आता विचारला जातोय. 

त्याचं कारण म्हणजे, २८ मार्च रोजी शरद पवारांनी सर्व लहान पक्षांची दिल्लीला आपल्या निवासस्थानी बैठक बोलवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जे पक्ष काँग्रेसबरोबर चर्चा करण्यास उत्सुक नाहीत त्यांच्याशी शरद पवार चर्चा करणार आहेत. नुकत्याच झालेल्या राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीत याचबाबतीत चर्चा झाल्याचं समजतंय. 

सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीस ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससह अनेक समविचारी पक्षाच्या नेत्यांनी गैरहजर राहणंच पसंत केलं होतं... त्यामुळे अशा समविचारी पक्षांना भाजपाविरोधी आघाडीत एकत्र आणण्याची जबाबदारी पवारांकडे आलीय. त्यामुळे २८ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीला राज ठाकरे दिल्लीला जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज यांचा मनसे आणि पवारांनी या बैठकीला बोलावलेल्या इतर पक्षांची विचारधारा पूर्ण भिन्न आहे.