दिनेश दुखंडे / दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अनाचक घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलीय.
ही भेट राजकीय नव्हती तसंच ती पूर्वनियोजित होती, अशी माहिती 'झी २४ तास'ला मिळतेय.
राज ठाकरे आणि शरद पवार या दोघांचाही एकच उद्देश आहे... आणि तो म्हणजे भाजपची घोडदौड रोखणं... यासाठीच हे दोन दिग्गज राजकीयदृष्ट्या एकमेकांशी हातमिळवणी करणार का? असा प्रश्न आता विचारला जातोय.
२८ मार्च रोजी शरद पवारांनी सर्व लहान पक्षांची दिल्लीला आपल्या निवासस्थानी बैठक बोलवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जे पक्ष काँग्रेसबरोबर चर्चा करण्यास उत्सुक नाहीत त्यांच्याशी शरद पवार चर्चा करणार आहेत. नुकत्याच झालेल्या राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीत याचबाबतीत चर्चा झाल्याचं समजतंय.
सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीस ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससह अनेक समविचारी पक्षाच्या नेत्यांनी गैरहजर राहणंच पसंत केलं होतं... त्यामुळे अशा समविचारी पक्षांना भाजपाविरोधी आघाडीत एकत्र आणण्याची जबाबदारी पवारांकडे आलीय. त्यामुळे २८ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीला राज ठाकरे दिल्लीला जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज यांचा मनसे आणि पवारांनी या बैठकीला बोलावलेल्या इतर पक्षांची विचारधारा पूर्ण भिन्न आहे.
- राज ठाकरे - शरद पवार यांच्या भेटीवर मनसे गोटातून ही राजकीय भेट नव्हती असं सांगितलं जातेय. पण कुणी अधिकृतपणे या भेटीवर बोलत नाहीय... त्यामागे काय कारण आहे?
- राज ठाकरे शरद पवारांना उद्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचे निमंत्रण द्यायला गेले होते का?
- उद्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे आपली पुढील राजकीय वाटचाल जाहीर करणार आहेत. देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. ठाकरे यांनी जाहीर भाषणं आणि व्यंगचित्रातून मोदी-शाह यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केलीय. भाजप विरोधी वातावरणाच्या दृष्टीनं पवार यांच्यासोबत चर्चा केल्याचीही चर्चा यानिमित्तानं सुरु आहे.