MNS Chief Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमेरिकेत सॅन होजेला येथे बृहन्मराठी मंडळाच्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी त्याच्या विविध पैलूंचा उलगडा करण्यात आला. राजकारण समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला याकडे राज ठाकरेंचा पाहण्याचा दृष्टीकोन समोर आला. तसेच विविध प्रश्नांवर त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.
राज ठाकरेंना आम्ही अनेक मराठी कलाकारांना मदत करताना पाहिलंय. त्यांनी मदत केल्याच्या अनेक गोष्टी कधी कोणाला कळूही दिल्या नाहीत. राज ठाकरे हे दानशूर व्यक्तीमत्व आहे. असा दानशूर माणूस कधी कुणाला घाबरलाय का? कधी पळून जाण्याची वेळ आली का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. आयुष्यात फक्त 2 व्यक्तींनाच घाबरत असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. त्या म्हणजे आई आणि माझ्या मुलांची आई या त्या 2 व्यक्ती असल्याचे राज ठाकरे म्हणाले. त्यांच्या उत्तराला सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
'एखादा डाकू हनिमूनला गेला तर तो बुलेटच्या पट्ट्या लावून आणि बंदूक घेऊन जातो का? तिथे तो वेगळा असतो. अर्थात मी माझी तुलना डाकूशी करत नाही', असे राज ठाकरे म्हणाले आणि सभागृहात हशा पिकला.
या उत्तरानंतर आनंद इंगळे कधी पळून जाण्याची वेळ आली का? या प्रश्नावर अडून राहिले. या प्रश्नासाठी त्यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंना सहभागी करुन घेतले. अशी कधी वेळ आली होती का? असा प्रश्न त्यांनी शर्मिला ठाकरेंना विचारला. त्यांनतर राज साहेबांना ते सांगायला आवडेल की नाही माहिती नाही पण 31 डिसेंबर...असा शब्द त्यांनी उच्चारला.
या शब्दाला पुढे नेत हा लग्ना आधीचा किस्सा असल्याचे राज ठाकरे म्हणाले. यानंतर मुलाखतकारांनी त्यांना हा किस्सा सांगण्याचा आग्रह केला.
'31 डिसेंबर रात्री लग्नाच्या आधीची गोष्ट. मध्यरात्री दोन ते अडीच वाजले होते. 31 डिसेंबर म्हणून मी आणि शर्मिला आम्ही दोघे कुठेतरी बाहेर गेलो होतो. मी शर्मिलाला तिच्या घराच्या बाहेर सोडलं. आमचं जमलंय हे सासरे मोहन वाघ यांना माहिती नव्हतं. 31 डिसेंबरचे दोन ते अडीच वाजले होते. मला कोणतरी फिरताना दिसलं. समोर बाबा आहेत राज निघ बाबा आहेत, असे शर्मिला म्हणत होती. मी म्हणलो आता कुठे बाबा येतील? बाबा नाहीत वॉचमन आहेत ते. ती म्हणाली नाही बाबाच आहेत. आणि जेव्हा मला ते येताना दिसले तेव्हा मी पळून गेलो होतो', अशी मिश्किल आठवण राज ठाकरेंनी करुन दिली.
हातामध्ये रंग रेषा आहेत. संगीताचा कान आहे. राज ठाकरे स्वत: उत्तम संगीत देऊ शकतात. मित्राच्या चित्रपटातील एक चाल राज ठाकरेंनी पहिल्यांदा गुणगणुली होती. यानंतर पुढचं गाण लिहिलं गेलं, अशी आठवण आनंद इंगळे यांनी सांगितली. 'छम छम करता है' या प्रसिद्ध गाण्याची मूळ चाल राज ठाकरेंची आहे, असे यावेळी आनंद इंगळे यांनी सांगितले. या आठवणीला राज ठाकरे यांनी दुजोरा दिला. संगीत मी दिलं असलं तरी त्या गाण्याचे शब्द माझे नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले.
2004 साली आलेल्या 'अगं बाई अरेच्चा!' या सिनेमाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले होते. हा सिनेमा त्यावेळी चांगलाच गाजला होता. वेगळं कथानक असलेल्या या सिनेमाची क्रेझ आजही 'छम छम करता है' हे प्रचंड गाजलेलं गाणं याच चित्रपटातील आहे. 'छम छम करता है' या गाणं बॉलिवूड अभिनेत्री सोनाली ब्रेंद्रे दिसते. सिनेमा आला तेव्हा दिग्दर्शक केदार शिंदे यांचे वय अवघे 28 वर्ष होते. 2004 इतका मोठा सिनेमा बनवल्याचे सर्व श्रेय ते राज ठाकरे यांना देतात.