मुंबई : अंधेरीत पाऊस सुरू झाल्यामुळे कामात अडथळा येत आहे. त्यामुळे लोकल सुरळीत होण्यास आणखी उशीर होण्याची शक्यता आहे. अंधेरी रेल्वे स्थानकातील दुर्घटनास्थळी २ फास्ट ट्रॅकवरील ढिगारे उपसण्याचं काम पूर्ण झालंय. आता ओव्हरहेड वायर दुरूस्तीचे काम सुरू झालंय. त्यासाठी ५०० रेल्वे कर्मचारी कार्यरत आहेत. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडून दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. रात्री ८ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरु होईल, असं वक्तव्य गोयल यांनी केलं होतं, पण अंधेरीमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
मुंबईतल्या ४४५ पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. पुढच्या ६ महिन्यांमध्ये पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याचं गोयल म्हणाले. तसंच या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना १ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून याचा रिपोर्ट १५ दिवसात येईल, असं गोयल यांनी सांगितलं.
मोटरमन चंद्रशेखर सावंत यांचा गौरव करण्यात येणार असून त्यांना ५ लाख रुपयांचं इनाम देण्यात येणार असल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली. मोटरमन चंद्रशेखर सावंत यांच्या प्रसंगावधानामुळे ही दुर्घटना टळली. सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी बोरिवलीवरून सुटणारी लोकल होती. पूल कोसळत असताना पाहताच मोटरमननं लोकल थांबवली. मोटरमन सावंत यांनी आर्मीमध्ये सेवा केली आहे. मोटरमननं प्रसंगावधान दाखवून गाडी थांबवल्यामुळं मोठी जीवितहानी टळल्याचं पोलसांनी म्हटलंय.