मुंबई: सर्वसामान्यांना रोज सहन कराव्या लागणाऱ्या रेल्वेच्या लेटमार्कची दखल घेत रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेच्या कामाकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांनी देशातील सर्वाधिक वाईट कामगिरी करणाऱ्या १० विभागांची व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली. यामध्ये मध्य रेल्वे विभागाचाही समावेश होता. रेल्वे बोर्डातर्फे देशातील सर्व विभागीय रेल्वेच्या वेळेबाबत पाहणी केली. यानुसार मध्य रेल्वेवरील रेल्वे उशिराने धावत असल्याचे दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथील ट्रेनचा या पाहणीत समावेश होता. मध्य रेल्वेच्या केवळ ५४ टक्के रेल्वे या वक्तशीरपणे धावत असल्याचे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले.
रेल्वेच्या विलंबाबाबत मध्य रेल्वेच्या अधिकार्यांना खडे बोल सुनावताना अध्यक्ष अश्वनी लोहाणी म्हणाले की, प्रत्येक विभागात रेल्वेचे वेळापत्रक आहे. त्या वेळापत्रकाचे पालन होणे आवश्यक आहे. वेळापत्रकानुसार रेल्वे धावण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, स्थानकातील फाटकांमुळे रेल्वेला विलंब होतो. दिवा, ठाकुर्ली, आंबवली, कल्याण स्थानकांत फाटक आहे. या फाटकांवर पूल बनविण्याचे काम सुरू आहे. मध्य रेल्वे आणि संबंधित महापालिका यांनी संयुक्तरीत्या हे काम करायचे आहे. रेल्वेने काम पूर्ण केले असून, संबंधित महापालिका क्षेत्रातील कामे अपूर्ण आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील मुंबई ते मडगाव जाणाऱ्या एसी डबलडेकरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवीन सुविधा देण्यात येणारे. मुंबई-मडगाव, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, यांसह एकुण ६ गाड्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात येणारे. यात ट्रेनमध्ये ऑन बोर्ड हाऊसकिपिंग स्टाफ, पीव्हीसी फ्लोरींगची सुविधा देण्यात येईल आणि दर दोन तासांनी टॉयलेट स्वच्छ करण्याची सुविधा यात देण्यात येईल. तर ट्रेनमध्ये फायर फायटिंगची अत्याधुनीक साधन सामग्रीचा देखील समावेश करण्यात येणारे. प्रोजेक्ट उत्कृष्ट आणि प्रोजेक्ट सक्षण याअंतर्गत या सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलीय.