Monsoon Update | राज्याला पूर्वमोसमी पावसाचा तडाखा; गारपीट आणि वादळी वाऱ्याने नुकसान

Monsoon Update | मान्सून अरबी समुद्र, श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे.

Updated: May 21, 2022, 07:42 AM IST
Monsoon Update | राज्याला पूर्वमोसमी पावसाचा तडाखा; गारपीट आणि वादळी वाऱ्याने नुकसान title=

मुंबई : मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला असून मान्सूनची घोडदौड वेगाने सुरू आहे. दक्षिणेच्या बाजूने मान्सून प्रगती करतोय. आता मान्सून अरबी समुद्र, श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे. राज्यात मान्सून 5 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. एकीकडे मान्सूनची घोडदौड वेगाने सुरू असताना राज्यात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा बसला आहे. शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. त्यामुळे काही भागांत फळबागांचं नुकसान झालं. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पूर्वोत्तर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो आहे. महाराष्ट्रातही या वाऱ्यांचा प्रभाव जाणवतो आहे.

आष्टी तालुक्यातल्या काही गावांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. उन्हाळी कांद्याचं मोठ्या प्रमाणात पीक बीडच्या आष्टीमध्ये घेतलं जातं. अवकाळी पावसामुळे या भागातील काढणीला आलेल्या कांद्याचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी अनेक ठिकाणी कांदे सोडून गेले आहेत. भिजलेल्या पिकातून आता काहीच उत्पन्न मिळत नसल्याचं शेतकरी सांगतायत. 

यवतमाळमध्ये मुसळधार

मान्सूनपूर्व पावसानं राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यवतमाळमध्ये काल संध्याकाळी चक्क गारांचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारांचा खच जमा झाला. त्यामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना गारव्याचा अनुभव घेता आला. काल दिवसभर कडक ऊन होतं. मात्र संध्याकाळी वातावरणात अचानक बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह, गारपीट आणि धुवाधार पाऊस बरसला. विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली.  

उस्मानाबादमध्ये मान्सूनपूर्व पावसाची धडक

उस्मानाबाद जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार धडक दिली. उमरगा, तुळजापूर, लोहरा तालक्यात जोरदार पाऊस झालाय. तर इतर तालुक्यात रिमझिम पाऊस बरसला. मुसळधार पावसामुळे उमरहा शहरातील बाजारपेठेत पाणी शिरलं. या पावसामुळे वातावरणात अल्हाददायक गारवा निर्माण झालाय. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. 

परभणीतही पावसाची हजेरी 

परभणी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटात जोरदार पाऊस परभणी शहरात झाला आहे. यासह जिल्ह्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

कोल्हापूरातही दैना...

मान्सूनपूर्व पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय. मान्सूनपुर्व पावसानं दैना उडवल्यानंतर पावसाळ्यात काय होईल याची चिंता कोल्हापूरकरांना सतावतेय. सोयाबीन, उन्हाळी हायब्रीड ,शाळू आणि भाजीपाला या पिकांचे या पावसानं नुकसान केलं असून नदी काठी गुडघाभर पाणी साचलं होतं.

हिंगोली जिल्ह्यात उकाड्यापासून दिलासा 

हिंगोली जिल्ह्यात संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यातील विविध भागात झाला. हिगोली शहरासह सेनगाव, औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावात पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर संध्याकाळी पाऊस पडल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. तापमानातही घट झाली.