‘‘शब ए बारात’च्या दिवशी डॉक्टर, नर्स, पोलिसांसाठी प्रार्थना करा’

मुस्लिम धर्मगुरुंचं आवाहन

Updated: Apr 8, 2020, 12:50 PM IST
‘‘शब ए बारात’च्या दिवशी डॉक्टर, नर्स, पोलिसांसाठी प्रार्थना करा’ title=

देवेंद्र कोल्हटकर, मुंबई :  मुस्लिमांनी शब ए बारात घरातच साजरी करा आणि डॉक्टर, नर्स आणि पोलिसांसाठी प्रार्थना करा, असं आवाहन मुस्लिम धर्मगुरुंनी मुस्लिम धर्मियांना केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शब ए बारातसाठी घराबाहेर पडू नका, असं आवाहनही मुस्लिम धर्मगुरुंनी केलं आहे.

मुस्लिम धर्मियांमध्ये पवित्र मानली जाणारी शब ए बारात गुरुवारी आहे. या दिवशी मुस्लिम धर्मीय मशिदीत तसेच कब्रस्तानमध्ये जाऊन पूर्वजांच्या कबरीवर फतिहा देतात म्हणजे पूर्वजांसाठी प्रार्थना करतात. पण सध्या लॉकडाऊन सुरु असल्यानं पोलिसांच्या आदेशाचं पालन करा, असं आवाहन मुस्लिम धर्मगुरुंनी केलं आहे. मुस्लिम धर्मगुरु मौलाना मोईन मिया आणि भायखळ्याच्या इमाम हिंदुस्तानी मशिदीचे मौलाना अब्दुल जब्बार यांनी भारत कोरोनामुक्त व्हावा यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन मुस्लिम धर्मियांना केले आहे.

दिल्लीत निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातीच्या मरकज कार्यक्रमात अनेक लोक एकत्र आल्यानं कोरोनाची लागण देशभरात फैलावली होती. या कार्यक्रमावरून वादंग झाला होता. या पार्श्वभूमीवर सरकारनंही मुस्लिम धर्मगुरुंशी संवाद साधला होता.

या आठवड्यात हिंदुंची हनुमान जयंती आणि मुस्लिमांचा शब ए बारात साजरे केले जाणार होते. मात्र सरकारनं लॉकडाऊनमुळे कोणतेही सण, समारंभ आणि कार्यक्रम साजरे करण्यास मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम धर्मगुरुंनीही मुस्लिम धर्मियांना आवाहन करून घराबाहेर न पडण्याची सूचना केली आहे.

मौलाना अब्दुल जब्बार यांनी आपल्या आवाहनात म्हटलं आहे, शब ए बारातसाठी मुस्लिमांनी बाहेर पडू नये. त्यांनी घरातच राहून नमाज अदा करावा. विशेषतः तरुणांनीही घराबाहेर पडू नये आणि पोलिसांशी सहकार्य करून कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

 

मुस्लिम धर्मगुरु मौलाना मोईन मिया यांनी कोरोना व्हायरस विरोधात लढणाऱ्या भारतवासीयांना आणि आरोग्य सेवकांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. शब ए बारातच्या दिवशी डॉक्टर, नर्स, पोलीस, महापालिका कर्मचारी आदींसाठी प्रार्थना करा, असं आवाहन मुस्लिम धर्मगुरुंनी केलं आहे.