मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) अखेर आज पार पडला. शिंदे गट आणि भाजपच्या एकूण 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना संधी मिळालेली नाही. यावेळी अनेक भाजपचे नेते उपस्थित होते पण पंकजा मुंडेया मात्र या उपस्थित नव्हत्या.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी नव्या मंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन.... महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा... विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) August 9, 2022
पंकजा मुंडे यांना विधानपरिषद निवडणुकीतही संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात होतं. मुंडे समर्थक कार्यतर्के ही आक्रमक झाले होते. शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील 9 आणि भाजपच्या 9 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
भाजपकडून आज राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजय कुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.