मुंबई : अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यानं महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे नाराज झाल्याची चर्चा आहे. यावरून राज्य मंत्रिमंडळातच संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.
विरोधकांनी अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्यास विरोध करताना, जोरदार गोंधळ घातला. तसंच विधिमंडळाचं कामकाज रोखून धरलं. मात्र मेस्मा लागू करणं योग्य असल्याची आक्रमक भूमिका पंकजा मुंडेंनी यावेळी घेतली. परंतु गुरूवारी सकाळी पंकजा मुंडेंशी चर्चा न करताच मुख्यमंत्र्यांनी मेस्माला स्थगिती दिल्यानं त्या नाराज असल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, पंकजा मुंडेंनी काल फेसबुकवर टाकलेल्या पोस्टची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. गोपीनाथ मुंडे आणि एका रडवेल्या बाळाचा फोटो त्यांनी पोस्ट केलाय. बाबा, मला तुमची उणीव सतत जाणवते, असं भावनिक वाक्य त्यांनी या पोस्टमध्ये टाकलंय.
पंकजा मुंडेंना आताच बाबांची आठवण का येतेय? मेस्मावरून उफाळलेला वाद आणि ही फेसबुक पोस्ट यांचा एकमेकांशी संबंध आहे का? अशी चर्चा विधीमंडळात रंगलीय.