कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही - संजय राऊत

'सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. जे ठरलं आहे तेच शिवसेना मागत आहे.'

Updated: Nov 8, 2019, 10:27 AM IST
कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही - संजय राऊत title=
संग्रहित छाया

मुंबई : भाजप-शिवसेनेच्या चर्चेत कुणाच्याही मध्यस्थीच्या गरज नाही, उद्धव ठाकरे निर्णयावर ठाम आहेत, अशी संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. काळजीवाहू सरकार म्हणजे भाजपचा डाव, अशी टीका राऊतांनी केली आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. जे ठरलं आहे तेच शिवसेना मागत आहे. त्यामुळे कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही, असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला पुन्हा इशारा दिला आहे. तसेच तिसऱ्याची गरज नाही, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जरी आले तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा भापजपला दिला आहे.

दरम्यान, संजय राऊत म्हणाले की, नितीन गडकरी मुंबईचे रहिवाशी आहेत, त्यामुळे तिथे जातील. लेखी पत्र घेवून येत असतील तर त्यांचा निरोप उद्धव ठाकरे यांना देतो. कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे तिसऱ्याची गरज नाही.

 
काळजीवाहू म्हणून रहावे म्हणून डावपेच आखले जात आहेत, असा थेट आरोप भाजपवर करत राजीनामा देवून बाहेर जायला हवे, हा जनादेशाचा अपमान आहे, असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. फार काळ काळजीवाहू सरकार राहू नये, त्यासाठी हालचाली होत असतील तर राज्यासाठी भल्याचे आहे. लवकरच आम्हीही राज्यपालांना भेटणार आहोत, असे सांगत आम्हीही तयार आहोत, असा स्पष्ट इशारा शिवसेनेच्यावतीने भाजपला दिला आहे.