"बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नीचं..."; नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल! पोलीस संरक्षण काढण्याचीही मागणी

Nitesh Rane On Sanjay Raut: संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरुन आज विधीमंडळामध्ये मोठा गदारोळ झाला. अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विधानावरुन नाराजी व्यक्त केली.

Updated: Mar 1, 2023, 08:10 PM IST
"बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नीचं..."; नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल! पोलीस संरक्षण काढण्याचीही मागणी title=
nitesh rane

Nitesh Rane Slams Sanjay Raut: खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळासंदर्भात केलेल्या विधानावरुन आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली. विधीमंडळाचा 'चोर मंडळ' असा उल्लेख राऊत यांनी केल्याने सत्ताधारी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेमध्ये संजय राऊतांवर कारवाई करण्याची मागणी केली. संजय राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊत यांच्या या विधानाचा तिव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला. संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करावी की नाही यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली असून 8 मार्च रोजी यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान आजच्या विधानसभेतील चर्चेमध्ये भाजपाचे आमदार आणि ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेल्या नितेश राणेंनी एकेरी उल्लेख करत संजय राऊतांवर टीका केली.

एकेरी उल्लेख करत टीका

संजय राऊत यांच्यावर टीका करताना नितेश राणेंनी आपल्या दीड मिनिटांच्या वेळेत पूर्णवेळ राऊत यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली. संजय राऊत हे शिवसेनेमध्ये येण्याआधी शिवसेनेविरोधात आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंविरोधात लिहायचे असं नितेश राणे म्हणाले. "रोज सकाळी आपल्याला हे जे काही संजय राऊतचं ऐकावं लागतं त्याची महाराष्ट्राला काही गरज आहे का? काय घेऊन खाल्लंय आपण त्याचं? तुम्ही मला सांगा अध्यक्ष मोहोदय त्याचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे?" असं म्हणत नितेश राणेंनी राऊत यांच्यावर टीका केली. 

बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचं...

तसेच पुढे बोलताना 'सामना'त येण्याआधी राऊत बाळासाहेबांविरोधात लिहायचे असंही नितेश म्हणाले. "रोज सकाळी आपल्याला हे जे काही संजय राऊतचं ऐकावं लागतं त्याची महाराष्ट्राला काही गरज आहे का? काय घेऊन खाल्लंय आपण त्याचं? तुम्ही मला सांगा अध्यक्ष मोहोदय त्याचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे?" असं म्हणत नितेश राणेंनी राऊत यांच्यावर टीका केली. "तो शिवसेनेमध्ये आला कधी? सामनामध्ये लिहिण्याआधी, पगार गेल्याआधी तो लोकप्रभामध्ये असायचा. तेव्हा त्याचे शिवसेनेचे विरोधात सगळे आर्टीकल असायचे. या संजय राऊतची एवढीही हिंमत झालेली की त्याने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्याविरोधात, शिवसेनेच्या विरोधात लिहिलेलं. त्याने एवढंही लिहिलेलं की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचं पटत नाही," असं नितेश राणे म्हणाले. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, "ठीक आहे, विषयांतर करु नका" असं म्हटलं.

10 मिनिटं संरक्षण काढायला...

यानंतर नितेश राणेंनी थेट संजय राऊतांचं पोलीस संरक्षण काढण्याची मागणी केली. "त्याचं संरक्षण काढा. पोलिसांचं संरक्षण घेऊ फिरतो तो. सरकारकडून मिळालेलं संरक्षण आहे. मार्मिकमध्ये छापलेलं कार्टून बघा. देशाचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांबद्दल असं तो छापू शकतो का? देशाच्या केंद्रीय मंत्र्यांना शिव्या घातल्या. त्याचं 10 मिनिटं संरक्षण काढायला सांगा. परत उद्या सकाळी तो दिसणार नाही असा शब्द देतो अध्यक्ष मोहोदय," असं नितेश राणेंनी पुन्हा आपल्या आसनावर बसण्याआधी म्हटलं.