स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी देशातील कोट्यावधी जनतेला अन्न, पाणी आणि निवारा या तीन मुलभूत गरजांसाठी झगडावे लागत आहे. महाराष्ट्रात एक असे गाव आहे ज्या गावात 75 वर्षांपासून महिन्यातून फक्त एकदाच पाणी मिळेत (Water Crisis). हे गाव कोणत्या दुर्गम भागात नाही तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई (Mumbai) शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे. नियमीत पाणी मिळावे यासाठी या गावातील महिला अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. आता या महिला आणखीच आक्रमक झाल्या आहेत.
मुंबईला पर्याय म्हणून विकसीत होत असलेल्या नवी मुंबई शहरातील उरण तालुक्यात करंजा गावातील हे भयाण वास्तव आहे. करंजा गावात पाण्यासाठी महिलांनी भव्य मोर्चा काढला आहे. करंजा गावात 28 दिवसांनी एकदाच पाणी येत, हे पाणी पिण्यासाठी वापरलं जाते.
दैनंदिन पावरासाठी पाणी विहरीतून काढलं जाते. उन्हाळ्यात विहरीचे पाणी देखील कमी होत. यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. अनेक वर्षांपासून या महिला पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. याविरोधात महिलांनी तहसील कार्यलयावर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी रोज पाणी मिळावे अशी मागणी केली आहे.
यंदा उन्हाळा सुरु होण्याआधीच भंडारा तालुक्यातील मोहाडीत भीषण जलसंकट निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.मोहाडी शहरात 2-3 दिवसाआड पाणी मिळत आहे. पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. कडक उन्हाळा यायला अजून एक महिना बाकी असताना मोहाडी शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. येथील पाणी पुरवठा योजना 45 वर्षे जूनी असल्याने ती पूर्णपणे निकामी झाली आहे. पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीची पातळी खोल गेल्याने टाकी लवकर भरत नसल्याचे सांगण्यात येत आहे.