मुंबई: मुंबई मेट्रोच्या आरे कारशेडला विरोध करणाऱ्या बोगस स्वयंसेवी संस्थांना परदेशातून निधी पुरवण्यात येत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आरेतील मेट्रोच्या कारशेडविरोधात वातावरणनिर्मिती करण्यात बोगस स्वयंसेवी संस्थांचा हात आहे. त्यांना विकासकामे ठप्प करायची आहेत.
यासाठी या स्वयंसेवी संस्थांकडून झटका डॉट कॉम हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाकडून आरे कारशेड विरोधात वातावरणनिर्मिती करण्यासाठी ८२ हजार ई-मेल्स पाठवण्यात आले. या सगळ्याविरोधात मी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
आरेतील कारशेडचे काम थांबले तर.... फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा
आरेतील जंगल तोडून त्याठिकाणी मेट्रो रेल्वेची कारशेड बांधण्यात येणार आहे. मात्र, पर्यावरणप्रेमींनी याला तीव्र विरोध केला होता. काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मेट्रो प्रशासनाकडून एका रात्रीत हजारो झाडांची कत्तल करण्यात आली होती. याविरोधात जोरदार निदर्शने झाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान हा मुद्दा चांगलाच तापला होता.
अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. यामुळे भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले होते. दरम्यान, आरे कारशेडला पर्यायी जागा सुचवण्यासाठी सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे भविष्यात या कारशेडचे काय होणार, याकडे सर्वांचे लागले आहे.