राष्ट्रवादीचा भाजपला सॉफ्ट कॉर्नर? मुख्यमंत्र्यांची थेट पवारांकडे तक्रार?

भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांना अधूनमधून डोळे मारतात?

Updated: Mar 31, 2022, 08:07 PM IST
राष्ट्रवादीचा भाजपला सॉफ्ट कॉर्नर? मुख्यमंत्र्यांची थेट पवारांकडे तक्रार? title=

Maharashtra Politics : सत्ताधारी महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. शिवसेना (ShivSena) नेते भाजपवर (BJP) जोरदार हल्ले चढवत असताना राष्ट्रवादी (NCP) मात्र बोटचेपी भूमिका घेत असल्याची मुख्यमंत्र्यांची भावना झाली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Udhav Thackeray) शरद पवारांकडे (Sharad Pawar) तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

मुख्यमंत्र्यांना असं वाटावं, अशा अनेक घटना घडल्यात. 
13 मार्चला मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना बीकेसीमधील सायबर विंगच्या कार्यालयात बोलावलं होतं. मात्र अचानक फडणवीसांच्या घरी जाऊन जबाब घेण्यात आला.

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध छेडलं गेलं. मात्र अजित पवारांनी (Ajit Pawar) दोन्ही बाजूंना सबुरीचा सल्ला दिला. 

12 भाजप आमदारांच्या निलंबनावरून वादळ उठल्यानंतर वर्षभरासाठी निलंबन व्हायला नको, असं सांगत अजितदादांनी सरकारला घरचा आहेर दिला. 

28 तारखेला राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करणारं ट्विट केलं.

केंद्रीय यंत्रणांना टक्कर देण्यासाठी पोलिसांचा पुरेपुर वापर केला पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. मात्र गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे ही खरी अडचण आहे. याबाबत उपमुख्यमंत्र्यांना विचारल्यानंतर ते गृहमंत्र्यांकडे बोट दाखवून मोकळे झाले. 

तर दुसरीकडे भाजप नेतेही शिवसेनेवर जहरी टीका करत असताना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबाबत मात्र जरा सॉफ्ट असल्याचं चित्र आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरावर भाजप आक्रमक पवित्रा घेते. मात्र राष्ट्रवादीच्या खात्यांमधील घोटाळ्यांवर मवाळ भूमिका घेतात.  गृहखात्यातील भ्रष्टाचारावर बोलताना फडणवीस मात्र दिलीप वळसे पाटलांना स्वच्छ असल्याचं सर्टिफिकेट देतात. 

फडणवीसांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला त्यावेळी अजितदादा कायदा वाकवून काही करू देत नसल्याचं व्हिडिओ क्लिपमधील वाक्य अधोरेखित केलं. 

या प्रकारांमुळे भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांना अधूनमधून डोळे मारत असल्याची मुख्यमंत्र्यांची भावना झालीये. आता थेट पवारांकडे तक्रार गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या भूमिकेत काही बदल होतो का याकडे शिवसेनेचं लक्ष असेल.