शिवसेनेनंतर आता भाजपच्या टार्गेटवर... रोहित पवार यांचा सनसनाटी आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

Updated: Oct 18, 2022, 02:41 PM IST
शिवसेनेनंतर आता भाजपच्या टार्गेटवर... रोहित पवार यांचा सनसनाटी आरोप title=

Maharashtra Politics : शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीचे (NCP) काही आमदार आम्हाला येऊन भेटतात, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं होतं. त्याआधी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) फुटली आणि दोन गट पडले. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सनसनाटी आरोप केल आहे.

शिवसेनेपाठोपाठ आता पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. भाजप लोकशाही कलुशित करण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका त्यांनी केलीय. शिवसेना फुटण्याच्या घटनेकडे राष्ट्रवादी संधी म्हणून पाहात नाही असं रोहित पवार म्हणाले. हा राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक धोकादायक काळ आहे, साम, दाम, दंड असो की केंद्रीय यंत्रणांचा दबाव कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवयाची, असं म्हणत रोहित पवारांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला.

आपण स्वत: पवार घराण्याचे सदस्य असलो तरी राजकारणातील घराणेशाहीचं समर्थन करत नाही, राजकारणात कायमस्वरुपी टिकून रहायचं असले तर प्रयत्न आणि कष्ट घ्यावे लागतात. काम करुन दाखव आणि जगाला दाखवून दे असं आपले आजोबा शरद पवार (Sharad Pawar) सांगतात, असंही रोहित पवार यांनी सांगितलं. 

शिवसेनेची बंड थोपवण्यात चूक झाली?
शिवसेनेत 40 आमदारांनी बंड केलं आणि पक्षात मोठी फूट पडली. पक्ष नेतृत्वाकडून बंड थोपण्यात कुठेतरी चूक झाली, पण बंडाचा हा डाव एक ते दोन महिन्यांपूर्वीचा नसावा तर जवपास एक ते दीड वर्षांपूर्वीचा असावा असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं. 10 ते 11 आमदार फुटतील असं वाटत होतं, त्या 40 बंडखोर आमदारांच्या मनता काय होतं, हे सांगू शकत नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

अजित पवार यांची प्रतिक्रिया
दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या विधानामागचा अर्थ नेमका काय हे रोहित पवारांनाच विचारेन असं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलंय. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने काम करावं असं अजित पवार यांनी सांगितलं.