महिलेवर पडल्या तांदळाच्या गोण्या; माथाडी कामगारांच्या चपळाईमुळे वाचला जीव; थरार कॅमेरात कैद

Navi Mumbai Accident : नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये तिथं काम करणाऱ्या एका महिलेवर तांदळ्याच्या गोण्या पडल्या होत्या. तिथल्या सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला.

आकाश नेटके | Updated: Mar 16, 2024, 12:27 PM IST
महिलेवर पडल्या तांदळाच्या गोण्या; माथाडी कामगारांच्या चपळाईमुळे वाचला जीव; थरार कॅमेरात कैद title=

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसी दाणा मार्केटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दाणा मार्केटमध्ये काम करत असताना एका महिलेवर तांदळाच्या गोण्यांचा ढीग पडला होता. त्यामुळे ही महिला खाली दबली. मात्र तिथे असलेल्या माथाडी कामगारांनी काही क्षणात या महिलेला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे. महिलेला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नवी मुंबईच्या एपीएमसी दाणा मार्केटमध्ये  रोज 150-180 गाड्या दाखल होत असतात. तसेच दाणा बाजारात दररोज 50 कोटींच्या आसपास उलाढाल होत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धान्य या बाजारात येत आणि ते मोठ्या गोदामात साठवलं जातं. कामगारांकडून एकावर अशा धान्यांच्या गोण्यांची थप्पी लावली जाते. अशातच अशाच प्रकारे लावलेल्या गोण्या या तिथल्या एका गाळ्यातील महिला कर्मचाऱ्यावर पडल्या होत्या. मात्र सुदैवाने तिथल्या माथाडी कामगारांनी क्षणाचाही विलंब न लावता महिलेला बाहेर काढलं.

दाणा मार्केटमधल्या एका गाळ्यात काम करत असताना एका महिला कर्मचाऱ्यावर तांदळाच्या गोण्यांचा ठिगारा पडला. मात्र तिथे ठिकाणी उपस्थित असलेल्या माथाडी कामगारांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या चपळतेने केवळ 30 सेकंदात तांदळाच्या सर्व गोण्या बाजूला काढत महिलेला वाचविले. तात्काळ मदत मिळाल्याने महिलेचा जीव वाचला. महिला किरकोळ जखमी झाली असून तिला माथाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखी समोर आला असून सर्वत्र माथाडी कामगारांच्या चपळतेचं कौतुक करण्यात येतंय.

दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला झाडूने एका गाळ्यात साफसफाई करत होती. त्याचवेळी अचानक तिच्या अंगावर शेजारी असलेल्या तांदळाच्या गोण्या कोसळल्या. तितक्यात माथाडी कामगारांनी धाव घेऊन या गोण्या बाजूला केल्या आणि महिलेला बाहेर काढलं. महिलेच्या हाताला दुखापत झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.