नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष?

काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल

Updated: May 28, 2020, 04:05 PM IST
नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष? title=

रामराजे शिंदे, दीपक भातुसे :  विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा काँग्रेस श्रेष्ठींचा विचार असून तशी विचारणा नाना पटोले यांना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्याचा काँग्रेसमध्ये विचार असला तरी पृथ्वीराज चव्हाण हे त्यासाठी अनुत्सुक असल्याचे कळते. जून महिन्यात काँग्रेसमध्ये काही संघटनात्मक बदल अपेक्षित असून त्यावेळी पटोले आणि चव्हाण यांना नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे असून ते महसूलमंत्रीही आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल, हे निश्चित आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे या पदासाठी इच्छुक असून गेल्या दोन दिवसांत दिल्लीत जाऊन त्यांनी भेटीगाठीही केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये जून महिन्यात संघटनात्मक बदल अपेक्षित असून त्यावेळी महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाचीही नियुक्ती केली जाईल, अशी शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पटोले यांना विचारणा झाली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष नियुक्त केले जाईल अशी चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपद भूषवलं असल्याने तसेच कायद्याचा अभ्यास आणि संसदीय कामकाजाचा दीर्घ अनुभव असल्याने त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद सोपवण्याचा विचार सुरु असल्याचे कळते.  

विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा असली तरी ते या पदासाठी इच्छुक नसल्याचे समजते. नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदावर नियुक्ती होण्याआधी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारणा करण्यात आली होती. पण त्यावेळी त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता तेच पद स्वीकारण्यास पृथ्वीराज चव्हाण तयार होणार नाहीत, असं म्हटलं जातं. पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्यास तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता अशी चर्चा होती. पण काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या पदावर कुणाची निवड करायची याचा काँग्रेसला अधिकार होता. त्यामुळे त्या चर्चेत काही तथ्य नव्हतं असं सूत्रांनी सांगितलं.

 

नाना पटोले आक्रमक चेहरा आणि विदर्भातील असल्याने त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याचा काँग्रेस श्रेष्ठींचा विचार आहे. प्रदेशाध्यक्षपद मिळाले तर पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे नाना पटोले यांनी झी २४ तासला सांगितले.