माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला! प्रसाद लाड यांचं स्पष्टीकरण

'शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो, कोणत्याही पक्षाचे असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो'

Updated: Jul 31, 2021, 10:29 PM IST
माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला! प्रसाद लाड यांचं स्पष्टीकरण title=

मुंबई : 'वेळ आल्यास शिवसेना भवनही (ShivSena Bhavan) तोडू, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार (BJP) प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं होतं. पण आपल्या भाषणाचा विपर्यास करण्यात आल्याचं स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिलं आहे. 

'घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा तेव्हा कारे ला आरे चं उत्तर दिलं जाईल', पण ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो, कोणत्याही पक्षाचे असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो, त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनबद्दल असं चुकीचं वक्तव्य माझ्याकडून कधीही केलं जाणार नाही, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

माझं भाषणामध्ये असं म्हणणं होतं, की आम्ही माहिमला येतो तेव्हा इतका पोलीस बंदोबस्त ठेवला जातो की जणू आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत, असं म्हटलं होतं. पण या वक्तव्याचा विपर्यात करण्यात आला. 

कोणत्याही प्रकारे शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता. त्यामुळे जर मी कोणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिलं आहे. 

प्रसाद लाड यांचं वक्तव्य काय होतं?

भाजपची ताकद काय आहे हे 2014 विधानसभा निवडणुकीत आपण दाखवलंय. कारण, त्यावेळी भाजप होती. भाजपला मानणारा कार्यकर्ता विचाराचा मतदार होता, तो आज पण भाजपसोबत आहे. त्यात आता सोने पे सुहागा हुआ है. नारायण राणे साहेबांना आणि राणे कुटुंबाला मानणारा स्वाभिमानचा एक मोठा गट राणेंच्या निमित्ताने भाजपात आला आहे. यामुळे भाजपची ताकद ही निश्चित दुप्पट झाली आहे. नितेशजी पुढच्या वेळेस आपण कार्यकर्ते हे थोडे कमीच आणू. कारण, आपण आलो की पोलिसही खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका, म्हणजे हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. त्यांचं कारण एवढी भीती आमची की त्यांना वाटतं की हे माहिममध्ये आले म्हणजे शिवसेना भवन फोडणारच. काही घाबरु नका, वेळ आली तर ते देखील करु", असं प्रसाद लाड म्हणाले होते.