मुंबई : गाडी पार्क कुठे करायची हा मुंबईतील सर्वात मोठा आणि गहन प्रश्न असतो. त्यामध्ये भीती असते ती दंड लागण्याची किंवा गाडी टो होण्याची. पार्किंग कुठे कसं करायचं हे देखील ठरवून लक्षात ठेवावं लागतं. आता ही कटकट कमी होणार आहे. याचं कारण म्हणजे मुंबईकरांना दिलासा देणारी आणि एक चांगली बातमी आहे.
मुंबईकरांना आता या पुढे नो पार्किंग झोनमध्ये वाहन लावलं असेल तर टोईंग करण्याची भीती असणार नाही. याचं कारण म्हणजे नो पार्किंगमधील गाड्यांचं टोईंग करणं थांबवणार आहेत. यापुढे नो पार्किंग झोनमधील वाहनं टोईंग करणं थांबवणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली.
आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. सर्वांत आधी आम्ही वाहने उचलून नेणे थांबवत आहोत. आपण सर्वांनी जर नियमांचे पालन केले तर प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग नियमित करण्यात येईल. तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की सांगा असंही आयुक्तांनी सांगितलं आहे.
मुंबई पोलिसांचा नो टोईंगचा नवा प्रयोग सुरू झाला आहे. मुंबई पोलिसांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मुंबईकरांना याचा बराच त्रास व्हायचा, एखादं वाहन नो पार्किंगमधून टोईंग केल्यानंतर होणारा त्रास आणि मनस्ताप जास्त असायचा. आता या त्रासापासून मुंबईकर वाचणार आहेत. मात्र त्यासाठी नागरिकांना आयुक्तांनी सांगितलेली अट पाळावी लागणार आहे.