Mumbai University Bribe: परीक्षेत पास करतो सांगून 10 हजार रुपये मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार इतर कोणत्या छोट्या संस्थेत नसून प्रतिष्ठीत मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये घडला आहे. येथे शिकत असलेल्या नापास विद्यार्थ्याला पास करण्यासाठी एका बड्या अधिकाऱ्याने लाच मागितल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. तक्रारदार विद्यार्थी हा आयडॉलमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. चौथ्या सत्रात त्याला तीन विषयात एटी-केटी लागली होती. त्यामुळे या विषयात उत्तीर्ण व्हायचं असल्यास दहा हजार रुपये दे अशी मागणी आयडॉलमधील अधिकाऱ्याने केल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे.
संबंधित विद्यार्थ्याने युवासेना विद्यार्थी संघटनेला यासंदर्भात माहिती दिली. एका इन्व्हेल्पमध्ये दहा हजार त्यासोबतच हॉल तिकीट आणि संपर्क क्रमांक लिहून देण्यास या संबंधित व्यक्तीने त्या विद्यार्थ्याला सांगितल्याची माहिती समोर येत आहे. या सगळ्या प्रकरणानंतर युवासेना आक्रमक झाली आहे. विद्यार्थ्याने संबंधित व्यक्तीचा फोटो आणि या सगळ्या संबंधीची तक्रार मुंबई विद्यापीठाची कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठ परीक्षा विभागाचा उन्हाळी सत्र परीक्षांचा निकाल आणि पुनर्मूल्यांकना करीता उशीर होत आहे. या दिरंगाईमुळे अनेक विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्याकरिता सहाय्यक कुलसचिव हिम्मत चौधरी यांना युवासेनेच्या वतीने जाब विचारण्यात आला.
युवासेना माजी सिनेट सदस्यांनी युवासेना पदाधिकाऱ्यांसह कुलसचिवांची भेट घेतली. पण समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांना घेराव घालण्यात आला होता. जोपर्यंत मान.कुलगुरु किंवा प्र कुलगुरु येऊन तोडगा काढत नाही तोपर्यंत आम्ही येथुन हलणार नाही अशी भुमिका युवासेनेने घेतली. प्रभारी संचालक,परीक्षा आमि मूल्यमापन डॉ.प्रसाद कारंडे व्यवस्थापन परीषद सभेसाठी निघाले त्यांचा मार्ग अडवून रोखून ठेवण्यात आला होता.