Mumbai News : मागील दोन ते तीन दिवसांपासून सकाळच्या वेळी मुंबईत वातावरण धुसर असून, दृश्यमानताही कमालीची कमी झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनीच या परिस्थितीला धुक्याचं चादर म्हटलं. पण, या धुक्यात कुठंच थंडीचा लवलेषही नव्हता. शुक्रवारीसुद्धा शहरात अशीच परिस्थिती असून, सर्वत्र धुसर वातावरण पाहायला मिळत आहे. मुळात मुंबईत असणारं हे धुकं हिवाळ्याआधीची चाहूल नसून, हे धुरकं आहे.
इंग्रजीत Smog अर्थात Smoke आणि Fog यांचं हे मिश्रण. मराठीत धूळ आणि धुक्याच्या मिश्रणाला धुरकं असं संबोधतात. वाऱ्याचा वेग जेव्हा अपेक्षेहून जास्त मंदावतो तेव्हा हवेत मुळातच असणारे धुलिकण दीर्घ काळासाठी एकाच ठिकाणी तरंगत राहतात. त्यांना पुढे जाण्यासाठी वाव नसल्यामुळं त्यांची एकाच ठिकाणी दाटी होते आणि यातून ही परिस्थिती उदभवते.
मुंबईत सध्या असंच चित्र पाहायला मिळत आहे. जिथं वाहनांतूनच उत्सर्जित होणारा धूर, ठिकठिकाणी सुरु असणारी बांधकामं, विकासकामं यांच्यातून निघणारी धूळ हवेत मिसळी गेल्यामुळं सध्या शहरावर धुक्याची नव्हे तर, प्रदूषणाचीच चादर पाहायला मिळत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं अपेक्षित आहे.
मुंबई आणि शहराला लागून असणाऱ्या उपनगरीय भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर नव्या इमारतींची बांधकामं सुरु आहेत. त्यात शहरात दर तिसऱ्या माणसाकडे खासगी वाहन आहे. त्यामुळं शहरातील प्रदुषणात क्षणाक्षणाला भर पडताना दिसत आहे. शहरातील प्रदूषणाची वाढणारी पातळी पाहता मुंबईची दिल्लीशी स्पर्धा लागल्यास गैर वाटण्याचं कारण नसेल.
शहरात पसरलेलं हे धुरकं पाहता श्वसनाचे विकार आणि दमा असणाऱ्यांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य यंत्रणांनी केलं आहे. याशिवाय अशुद्ध हवेमुळं विषाणूंच्या संसर्गाचाही मोठा धोका आहे, त्यामुळं श्वसनाचा त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शक्य असल्यास मास्कचा वापर करा, उघड्यावरचे पदार्थ खाणं टाळा अशा प्राथमिक उपाययोजनांवर भर देणं नागरिकांसाठी फायद्याचं ठरेल.