मुंबई : सार्वजनिक वाहनतळाशेजारी अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास मुंबई महापालिकेने आजपासून सुरूवात केली आहे. परंतु ठिकठिकाणी पालिकेच्या या निर्णयाविरोधात लोक रस्त्यावर उतरू लागले असून वादावादीचे प्रकार घडत आहेत. दरम्यान, उद्यापासून पार्किंग कारवाईचा हा मुद्दा तापू शकतो. कुठलंही नियोजन न करता आणि लोकांचा, नगरसेवकांचा विरोध असतानाही प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतल्यानं वादाचे प्रकार घडत आहेत.
मलबार हिल येथील जे. मेहता मार्गावर अनधिकृत पार्क केलेल्या ५-६ चारचाकी गाड्या पालिकेनं उचलून नेल्यानंतर इथल्या रहिवाश्यांनी कारवाईला जोरदार विरोध दर्शवला. मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्यानंतर भाजपचे स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांनीही इथे येवून कारवाईला विरोध केला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी केली जात आहे. शहरात अनेक ठिकाणी असे वादाचे प्रकार घडताना दिसत आहेत.