मुंबई: उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर,सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रूळांच्या देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप जलद, वडाळा रोड ते मानखुर्द तर पश्चिम रेल्वेवर रात्रीकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेवरील दिवा ते कल्याण या दरम्यान शनिवारी रात्री एक ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत पॉवर, ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी ठाकुर्ली स्थानकावर नवीन पादचारी पुलाचे ६ मीटर रूंदीचे ४ गर्डर टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे धीम्या मार्गावरून कल्याण दिशेकडे जाणारी लोकल दिवा आणि कल्याण दरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येईल.
मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर ब्लॉक सकाळी १०.५४ वाजल्यापासून ते दुपारी ३.५२ पर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी दिशेकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेसला २० ते ३० मिनिटे उशीराने धावतील.
हार्बर रेल्वे - वडाळा रोड ते मानखुर्द अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० वाजेपासून ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. परिणामी सीएसएमटीहुन पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक दरम्यान पनवेल ते मानखुर्द विशेष लोकल सेवा चालविण्यात येईल.
तर पश्चिम रेल्वेमार्गावर बांद्रा स्थानकातील गर्डर हटविण्याच्या कामासाठी वसई रोड आणि भाईंदर स्थानकादरम्यान अप जलद आणि अप- डाऊन हार्बरवर शनिवारी रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत ब्लॉक असेल. परिणामी जलद मार्गावरील सीएसएमटी दिशेकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल सांताक्रुझ आणि माहिम स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर चालविण्यात येईल. तसेच सीएसएमटीहून अंधेरीकडे जाणाऱ्या लोकल सेवा रात्री १०.१२ वाजेपर्यंत तर वांद्रे, अंधेरी, गोरेगावहून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या सर्व लोकल रात्री १०.३८ वाजेपर्यंत रद्द करण्यात येणार आहे.