मुंबई उत्तर मध्य लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?

सतत लाटेवर स्वार होत निकाल देणारा मतदारसंघ म्हणून मुंबईतल्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे.

Updated: Jun 25, 2018, 08:48 PM IST
 मुंबई उत्तर मध्य लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार? title=

अमित जोशी, झी मीडिया मुंबई : सतत लाटेवर स्वार होत निकाल देणारा मतदारसंघ म्हणून मुंबईतल्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. बहुभाषिक, बहुधार्मिक, समाजातले सर्व स्तर असलेला हा मतदारसंघ. त्यामुळेच एखाद्या पक्षाचं वर्चस्व या मतदारसंघात कधीच बघायला मिळालं नाही. सध्या या मतदारसंघात राजकीय हवा काय आहे. उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना, कुर्ला, चांदिवली आणि विलेपार्ले असा पसरलाय.  

महाराष्ट्राचे एक राजकीय सत्ताकेंद्र मातोश्री या मतदारसंघात येतं. तर बहुतांश बॉलीवुड स्टार्सही याच मतदारसंघात राहातात. सरकारी कर्मचा-यांची मोठी वसाहत, आर्थिक केंद्र असलेलं वांद्रे-कुर्ला कॉमप्लेक्स, मुंबईला जगाशी जोडणारे दोन विमानतळ, मुंबईतलं अत्यंत वर्दळीचं वांद्रे आणि लोकमान्य टिळक असे दोन रेल्वे टर्मिनस अशी या मतदारसंघाची ओळख.

 वांद्रे - खार - सांताक्रुझ या भागांत उच्चभ्रु श्रीमंत वस्ती, विलोपार्ले-कलिनामध्ये मध्यमवर्गीय वस्ती तर कुर्ला परिसरामध्ये गरीब वस्ती असं वैविध्य इथे आहे. या मतदारसंघात लाटेवर आधारित मतदान होतं. GFX IN २०१४ साली मोदी लाटेत भाजप उमेदवार आणि दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्य़ा पूनम महाजन यांना  तब्बल ४ लाख ७८ हजार मतं मिळाली. तर दोन वेळा खासदार असलेल्या काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना २ लाख ९१ हजार मतांवर समाधान मानावं लागलं. 

2014 विधानसभेची निवडणूक सगळेच पक्ष स्वतंत्र लढले... 

सहापैकी ३ जागा शिवसेनेने तर २ जागा भाजपानं आणि एक जागा काँग्रेसनं जिंकली.  २०१७ च्या फेब्रुवारीत झालेल्या मुंबई पालिका निवडणुकीतही तसंच चित्र बघायला मिळालं. शिवसेनेने १६ वॉर्ड जिंकले, भाजपाने १० तर काँग्रेस आणि मनसेनं प्रत्येकी सहा वॉर्ड जिंकले. 

या भागांत मुस्लिम मतदार निवडणुकीवर प्रभाव टाकेल एवढा आहे. पण या मतदारांनी देशभर चर्चेत असलेल्या एमआयएमला साफ नाकारल्याचं चित्रही याच मतदारसंघात पाहायला मिळालं. 

आता चार वर्षानंतर राजकीय परस्थिती बरीच बदललीय. युतीचं अजून काही निश्चित नाही... पण शिवसेनेनं आताच उघडपणे विद्यमान खासदारांविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केलीय. असं असलं तरी पुन्हा निवडून येऊ असा विश्वास पूनम महाजन यांना आहे.

लोकसभा निवडणुक झाल्यानंतर पुनम महाजन जनतेला विसरल्या, असा शिवसेनेचा आरोप आहे. तर सध्या भाजपाबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या आरपीआय आठवले गटानेही पुनम महाजन यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलीये.

या मतदारसंघात कामं झालेली नाहीत, त्यामुळे यंदा आपलाच विजय होईल, असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय. 

प्रमोद महाजन यांना जनतेची नस चांगली माहिती होती, जनसंपर्क चांगला होता. त्या तुलनेत त्यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार यांचा जनतेशी तसा संपर्क नाही.... त्यामुळे पूनम महाजन पुन्हा निवडून येणं अवघड असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. 

सध्या या मतदारसंघात भाजपाविरोधात नाराजी आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाबरोबर मित्र पक्ष असतील का, भाजपा उमेदवार म्हणून नवीन चेहरा देणार का, यावरही निकालाचं बरंचसं गणित अवलंबून असणार आहे.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या समस्या

उत्तर मध्य मुंबईचे प्रमुख प्रश्न गेल्या चार वर्षांत सुटलेत का. इथल्या खासदारांच्या कामावर मतदार समाधानी आहेत का.... पाहुया लेखाजोखा उत्तर मध्य मुंबईचा. 

उत्तर - मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात कामाच्या बाबतीत पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा विद्यमान खासदार पुनम महाजन यांनी केलाय... खासदार निधीचा चांगला वापर करत शौचालय समस्यांपासून अनेक समस्या सोडवल्याचा त्यांचा दावा आहे. 

पूनम महाजन यांचा कामं केल्याचा दावा असला तरी मतदारसंघातल्या समस्या तशाच असल्याचं चित्र आहे.... देशाच्या आर्थिक राजधानीत अत्यंत व्यस्त असलेल्या मुंबई विमानतळाला झोपडपट्ट्यांनी विळखा घातला आहे. सुमारे एका लाखापेक्षा जास्त कुटुंब या विमानतळाला खेटून रहातात.  सुरक्षेसाठी झोपडपट्ट्यांच्या पुर्नवसनाची चर्चा केली अनेक वर्षे सुरु आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यावर हा प्रश्न सहज मार्गी लागेल अशी आशा इथल्या रहिवाशांना होती. मात्र खासदारांनी साफ निराशा केल्याची टीका विरोधी पक्षाची आणि रहिवाशांची आहे. 

लोकमान्य टिळक टर्निमस आणि वांद्रे टर्मिनस या दोन प्रमुख टर्मिनससह या मतदारसंघातल्या रेल्वे स्थानकांची स्थिती जैसे थे आहे.  विकास झाला य कुठे, असा प्रश्न विरोधकांबरोबर सत्ताधा-यांनीही उपस्थित केला आहे.

स्वच्छतेच्या गप्पा मारणा-या भाजपाच्या काळांत मिठी नदीच्या स्थितीमध्ये फरक पडेल अशी आशा पर्यावरणवाद्यांना होती. मात्र नदीचे रुंदीकरण झाले म्हणजे विकास झाला अशा भ्रमात भाजपाचेही सरकार असल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासक गिरीश राऊत यांनी केला आहे.

मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांची कामे या मतदारसंघात काही प्रमाणात सुरु असली तरी एक खासदार म्हणून पुनम महाजन यांनी साफ निराशा केली असल्याचं विश्लेषकांनी सांगितलं.

एकही मोठा प्रकल्प किंवा काम या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गेल्या चार वर्षात पूर्ण झालेलं नाही.  त्यामुळे मतदार संघातल्या समस्या पाहाता पुनम महाजन यांना आगामी लोकसभा निवडणुकीत जनता पुन्हा निवडुन देणार का हा खरा प्रश्न आहे.