Mhada Lottery : मुंबई अनेकांचीच कर्मभूमी असली तरीही या कर्मभूमीतच हक्काचं घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न अद्यापही अपूर्णच आहे. आर्थिक पाठबळ नसल्या कारणानं आणि शहरातील घरांचे दर आभाळाला गवसणी घालत असल्यामुळं हे स्वप्न स्वप्नच राहत असल्याची सद्यस्थिती. पण, आता मात्र एक चालून आलेली सुवर्णसंधी हे स्वप्न साकार करण्यास हातभार लावणार आहे, याचं श्रेय जातं ते म्हणजे म्हाडाला.
(Mhada Lottery) म्हाडाकडून लवकरच सामान्यांना परवडतील अशा दरांत शहरातील एका महत्त्वाच्या भागात छानशी घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे म्हाडाच्या या घरांची घोषणा लवकरच केली जाणार असून, उच्च उत्पन्न गटातील इच्छुकांना या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार सध्या म्हाडाच्या पहिल्यावहिल्या पंचतारांकित 39 मजली इमारतीची उभारणी आता अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. जिथं घरांच्या सोडतीमध्ये जिंकणाऱ्यांना एकाहून एक सरस सवलती आणि सोयीसुविधांचाही लाभ घेता येणार आहे.
उच्च उत्पन्न गटासाठी असणाऱ्या या घरांसोबत एक उत्तम जीवनशैली अर्ज विजेत्यांना मिळणार आहे. गोरेगावमधील या गगनचुंबी इमारतीमध्ये स्विमिंग पूल, इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, जीम आणि इतर आऊटडोअर सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. जून 2024 पर्यंत या इमारतीचं बांधकाम पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळं त्याच सुमारास ही सोडत जाहीर केली जाण्याची दाट शक्यता आहे.
म्हाडाच्या या 39 मजली इमारतीमध्ये एकूण 332 घरं सोडतीसाठी उपलब्ध होणार असून, आर्थिक सुबत्तेनुसार मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यम वर्गीयांना या सोडतीमध्ये सहभागी होता येणार आहे. तेव्हा आता अनेकांनाच या सोडतीची प्रतीक्षा लागून राहिली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. म्हाडाकडून यासंदर्भातील जाहीर माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाणार असल्यामुळं तुमचंही त्यावर लक्ष असूद्या.