Mega Block : प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष्य द्या... जर तुम्ही रविवारी (23 एप्रिल) घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा. रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) असणार आहे. यामुळे मुंबई लोकल (Mumbai Local) रेल्वे सेवेवर काही काळ परिणाम होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माहीम ते मुंबई सेंट्रल अप जलद मार्गावर रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
मध्य आणि हार्बर मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी एक दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11 .5 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. यादरम्यान, सीएसएमटी येथून धिम्या मार्गावरून सुटणाऱ्या लोकल माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबणार आहेत. तर मुलुंड स्थानकापुढे या लोकल पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड – माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील आणि त्यापुढे अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11. 10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी, वडाळा येथून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल आणि वांद्रे, गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तर पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत. या कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेकडून ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी 22 आणि 23 एप्रिल शनिवारी रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत माहीम आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप फास्ट आणि पाचव्या मार्गावर चार तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत, सर्व अप जलद मार्गावरील उपनगरीय गाड्या सांताक्रूझ आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर चालवल्या जातील. त्यामुळे रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन मेगा ब्लॉक नसेल.