Mumbai News : मुंबईतील (Mumbai) कुर्ला (Kurla) भागातील एका रहिवासी इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 39 रहिवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे (fire brigade) जवान घटनास्थळी पोहोचले आणि सुमारे 50-60 जणांना सुखरूप बाहेर काढले. आग पूर्णपणे आटोक्यात आली असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम भागातील कोहिनूर हॉस्पिटलजवळील एसआरए इमारतीत ही आग लागली. अग्निशमन विभागाने ही आग लेव्हल-1ची असल्याची माहिती दिली. ही आग तळमजल्यापासून 12व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रिक डक्टमधील स्क्रॅप मटेरियल इत्यादींपर्यंतच ही आग मर्यादित होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती पालिकेने दिली. आगीच्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये रात्रीच्या आभाळात दाट काळा धूर पसरलेला दिसत आहे.
Maharashtra | Fire broke out in a building in Mumbai's Kurla area. Fire brigade personnel reached the spot as soon as information about the fire was received and rescued around 50-60 people from different floors, out of which 39 people were admitted to the nearby hospital. Fire…
— ANI (@ANI) September 16, 2023
आगीमुळे गुदमरल्याचा त्रास झाल्यामुळे 39 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 39 जणांपैकी 35 जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तर इतर चार जणांना कोहिनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना वैद्यकीय मदत मिळाल्यानंतर घरी सोडण्यात आले.
डोंबिवली इमारत दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
डोंबिवलीच्या आयरे दत्तनगर परिसरामध्ये आदित्य नारायण ही तीन मजली इमारत शुक्रवारी कोसळली. तब्बल सात तास अग्निशमन दल आणि टीडीआरएफने ढिगारा बाजूला काढून त्यातून तीन जणांना बाहेर काढले. यातील अरविंद भाटकर आणि सुनील लोढिया यांचा मृत्यू झालाय. तर लोढिया यांची पत्नी दिप्ती यांना ढिगाऱ्याखालून जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. सध्या त्यांच्यावर डोंबिवलीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धोकादायक असलेले या इमारतीत नागरिक राहत होते. महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच ही इमारत खाली केली होती. मात्र राहण्याची दुसरी सोय नसल्याने काही कुटुंबे नाईलाजास्तव या धोकादायक इमारतीत राहत होती. सायंकाळी ही इमारत खचून ती कोसळली. त्यात तीन जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. दरम्यान या दुर्घटनेनंतर अनेक कुटुंबाचा निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून अनेकांने साहित्य घरातच राहिलेले आहे. त्यामुळे राहायचं कुठे असा प्रश्न इथल्या रहिवाशांना पडलाय. मदत कार्य पूर्ण झाल्यावर निदान आमच्या घरातील साहित्य तरी आम्हाला घेऊन द्या अशी विनंती या रहिवाशांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.